धक्कादायक! मोरोक्कोमध्ये जबरदस्त भूकंपात 300 लोकांचा मृत्यू; जाणून घ्या घटनाक्रम

Morocco Earthquake: रात्री 11:11 वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता 6.8 इतकी होती आणि काही सेकंदांपर्यंत हादरा बसला, अशी माहिती यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिली.

Pravin Dabholkar | Updated: Sep 9, 2023, 12:28 PM IST
धक्कादायक! मोरोक्कोमध्ये जबरदस्त भूकंपात 300 लोकांचा मृत्यू; जाणून घ्या घटनाक्रम title=

Morocco Earthquake: आफ्रिकन देश मोरोक्कोमधील आजची पहाट खूपच धक्कादायक झाली. आपला आयुष्यातील शेवटचा दिवस पाहण्याचाही अवधी या नागरिकांना मिळाला नाही. येथे पहाटे शक्तिशाली भूकंपाने हाहाकार माजवला. भूकंपामुळे येथे 296 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 153 जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. भूकंपाची तीव्रता 6.8 असल्याचे सांगण्यात येत आहे.  मोरोक्को येथे ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

अचानक जाणवू लागलेल्या भूकंपाच्या जोरदार धक्क्यानंतर लोक घाबरले. काय करावे जे कळायच्या आतच भूकंपाचे तीव्र धक्के बसू लागले. यानंतर मोरोक्कोमधील नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. भूकंपामुळे ऐतिहासिक वास्तूंचे मोठे नुकसान झाले असून वीजपुरवठाही खंडित झाला आहे. 

हा भूकंप माराकेशच्या नैऋत्येस रात्री 11:11 वाजता झाला. मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे आतापर्यंत किमान 296 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 153 जण जखमी झाल्याची माहिती स्पेक्टेटरने दिली आहे.

पंतप्रधान मोदींचे ट्विट 

आफ्रिकन देश मोरोक्कोमध्ये झालेल्या भूकंपानंतर जगभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील  X (पूर्वीचे ट्विटर) वर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
'मोरोक्कोमधील भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीमुळे खूप दुःख झाले. या दुःखद प्रसंगी आम्ही मोरोक्कोच्या लोकांसोबत आहेत. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्यासाठी शोक व्यक्त करतो. तसेच जखमी लवकरात लवकर बरे होवोत, यासाठी प्रार्थना करतो. या कठीण काळात भारत मोरोक्कोला सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

रिश्टर स्केलवर 7 तीव्रता 

रात्री 11:11 वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता 6.8 इतकी होती आणि काही सेकंदांपर्यंत हादरा बसला, अशी माहिती यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिली. मोरोक्कोच्या राष्ट्रीय भूकंप निरीक्षण आणि चेतावणी नेटवर्कने रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7 एवढी मोजली.  तर यूएस एजन्सीने भूकंपाच्या 19 मिनिटांनंतर 4.9 तीव्रतेचा भूकंप नोंदवल्याची माहिती समोर येत आहे.

मोरोक्कन लोकांनी भूकंपाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये काही इमारती जमिनदोस्त होऊन ढिगारा झाल्याचे दिसते आहे. तसेच ऐतिहासिक इमारतींचे काही भाग खराब झाले आहेत.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x