देशात कोरोनाचा कहर सुरुच, १० हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोना रुग्णांची संख्या ३.५० लाखांच्या वर गेली आहे.

Updated: Jun 17, 2020, 09:12 AM IST
देशात कोरोनाचा कहर सुरुच, १० हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू title=

मुंबई : कोरोनाचा कहर देशात थांबताना दिसत नाहीये. कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 50 हजारांवर गेली आहे. तर 10 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 1 लाख 87 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, देशात एकूण 3 लाख 54 हजार 161 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

हा डेटा सरकारने जाहीर केलेला नाही. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे आतापर्यंत 11 हजार 921 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 1 लाख 87 हजाराहून अधिक लोक बरे झाले आहेत. 1 लाख 54 हजारांहून अधिक रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. कोरोनातील मृत्यूच्या आकड्यांमध्ये अचानक वाढ होते आहे.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 2701 नवीन रुग्ण वाढले असून 81 लोकांचा मृत्यू झाला. यासह, महाराष्ट्र सरकारने मागील काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या 1328 मृत्यूंचा समावेश करण्यासाठी आपल्या आकडेवारीत बदल केला आहे, परंतु अहवाल मिळाला नाही. या आकडेवारीनुसार एकट्या मुंबईत 862 लोकांचा मृत्यू झाला आहे.

आता महाराष्ट्रात मृतांचा आकडा 5 हजार 537 वर गेला आहे. पुष्टी झालेल्या प्रकरणांची संख्या 1 लाख 13 हजार 445 आहे, ज्यामध्ये सक्रिय प्रकरणांची संख्या 50 हजारांपेक्षा जास्त आहे. त्याच वेळी, 57 हजारांहून अधिक लोक बरे झाले आहेत. एकट्या मुंबईत कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 60 हजाराहून अधिक आहे, ज्यामध्ये 3168 लोकांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासांत दिल्लीमध्ये कोरोनाचे 1859 नवीन रुग्ण आढळले असून 93 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसातील हा सर्वात मोठा मृत्यू आहे. आता एकूण रूग्णांची संख्या 44 हजार 688 झाली आहे. आता दिल्लीत मृतांचा आकडा 1837 वर गेला आहे. आतापर्यंत दिल्लीत 16 हजार 500 लोकं बरे झाले आहेत.