Monsoon News : मे महिन्याचा शेवट जसजसा जवळ येतो, तसतशी सर्वांनाच उत्सुकता लागते ती म्हणजे मान्सूनच्या आगमनाची. मान्सून... म्हणजे मोसमी वारे किंवा हवामानाची एक सुखावणारी स्थिती. अशा या मान्सूनची प्रत्येकजण चातकाप्रमाणे वाट पाहत असतो. आग ओकणाऱ्या सूर्यामुळं दाह क्षणोक्षणी वाढत असतानाच मान्सूनची चिन्हंसुद्धा सुखावह ठरतात, अशातच त्याच्या येण्याची साक्ष मिळणं म्हणजे एग वेगळीच जाणीव.
मान्सून कधी येणार? (Monsoon Predictions) इथपासून मान्सून कुठे आला आणि मान्सून अमुक ठिकाणी पोहोचला, तमूक ठिकाणहून पुढे सरकला या सर्व चर्चांमध्ये मान्सून हा शब्द वारंवार कानांवर येतो. पण, या शब्दाचा नेमका अर्थ माहितीये? त्याचा वापर केव्हापासून सुरू झाला याची कल्पना आहे?
मान्सून हा मूळचा अरबी भाषेतील शब्द. अरबीतील 'मौसिन' या शब्दावरून मान्सूनतची उत्पत्ती झालीय; जिथं, अरबी समुद्रात नौकांसह उतरलेल्या खलाशांनी 'मॉवसिम' या शब्दाचा सर्वप्रथम वापर केला. अरबी खलाशांनी समुद्रातील वाऱ्यांना त्यांनी 'मान्सून' म्हणण्यास सुरुवात केली. तिथं अरबी भाषिकांनी 'मौसिन' किंवा 'मॉवसिम' या शब्दांचा वापर केलेला असतानाच ब्रिटीशांनी या शब्दाचा सर्वप्रथम वापर केल्याचंही सांगण्यात येतं. आशिया खंडात जून ते सप्टेंबर या काळात येणारा पाऊस म्हणजे मान्सून, असाही त्याचा आणखी एक अर्थ.
मान्सूनची नेमकी सुरुवात कधीपासून झाली याविषयी अनेकांनी दावे केल्याचं पाहायला मिळतं. असं म्हटलं जातं की, मान्सून 5 कोटी वर्षांपूर्वी जन्मला आणि हा तोच काळ होता जेव्हा भारतीय उपखंड तिबेटन पठारांच्या दिशेनं पुढे सरकत होता. मान्सूनचं सध्याचं स्वरुप पाहता सर्वप्रथम तो 80 लाख वर्षांपूर्वी उदयास आल्याचं म्हटलं जातं. चीनमधील काही रोपं आणि जीवाश्मांच्या निरीक्षणाच्या बळावर काही तज्ज्ञ मंडळी मान्सून ही संकल्पना दोन कोटी वर्षे जुनी असल्याचं सांगतात.
दक्षिण आशियाई देशांमधील हवामानावर मान्सूनचे मोठे परिणाम दिसून येतात. ज्याचा थेट संबंध या भागातील शेती, अर्थव्यवस्था आणि इतर घटकांवर होताना दिसतो. गीष्म ऋतूनंतर दिशा बदलणाऱ्या वाऱ्यांनाही मान्सून असं म्हटलं जातं. हे तेच वारे असतात जे थंड क्षेत्राकडून उष्ण कटीबंदीय क्षेत्रात वाहू लागतात आणि ज्यामुळं हवेत आर्द्रता वाढण्यास सुरुवात होते. परिणामस्वरुप पाऊसही बरसतो. सोप्या भाषेत, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वारे समुद्रावरून वाहतात, ज्यामुळं बाष्पनिर्मिती होते आणि याच बाष्पयुक्त वाऱ्यांमुळं बरसणाऱ्या पावसाला मान्सून असं म्हटलं जातं.