माकडांनी सराफाचे २ लाख रुपये लुटले, पाठलाग केल्यानंतर ६० हजार फेकून पसार

उत्तर प्रदेशात कुत्र्यांचे वाढते हल्ले सुरुच असताना आता माकडांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आग्रामध्ये एका सराफाकडील नोटांनी भरलेली बॅगच चक्क माकडांनी लंपास केलीय.

Updated: May 31, 2018, 08:29 AM IST
माकडांनी सराफाचे २ लाख रुपये लुटले, पाठलाग केल्यानंतर ६० हजार फेकून पसार  title=
Image: ANI

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात कुत्र्यांचे वाढते हल्ले सुरुच असताना आता माकडांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आग्रामध्ये एका सराफाकडील नोटांनी भरलेली बॅगच चक्क माकडांनी लंपास केली आहे. यानंतर पुढे जे काही घडलं ते पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. पाहूयात नेमका काय आहे हा प्रकार...

आग्रा परिसरातील सराफाकडील पैशांची बॅग माकडांनी पळवल्यानंतर त्या सराफाने माकडाचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. यानंतर माकडाने बॅगेतील जवळपास ६० हजार रुपये काढून फेकले आणि त्यानंतर बॅग घेऊन पळाला. सराफाच्या बॅगेत २ लाख रुपये होते.

मुलीच्या हातात होती रुपयांनी भरलेली बॅग

मिळालेल्या माहितीनुसार, हलका मदन परिसरात राहणारे सराफ विजय बन्सल हे आपली मुलगी नैसी सोबत बँकेत २ लाख रुपये जमा करण्यासाठी जात होते. रुपयांनी भरलेली बॅग त्यांनी आपल्या मुलीच्या हातात दिली होती. बँकेत जाण्यासाठी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जात असतानाच त्या ठिकाणी तीन-चार माकडांनी प्रवेश केला आणि मुलीच्या हातातील बॅग खेचून घेतली. 

गार्ड-पोलिसांनी केला माकडांचा पाठलाग

रुपयांनी भरलेली बॅग पळवल्यानंतर सराफाने आणि मुलीने आरडा ओरड करण्यास सुरुवात केली. यानंतर बँकेचा सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी माकडांचा पाठलाग केला. यावेळी माकडांनी बॅगेतील शंभर रुपयांच्या सहा बंडल इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन खाली फेकल्या. तर, इतर नोटांचे बंडल घेऊन पसार झाले.

सराफाला मोठा झटका

या घटनेनंतर सराफ विजय बंसल आणि त्यांच्या परिवाराला एक मोठा झटका बसला आहे. पोलिसांनीही या विचित्र प्रकरणाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, कारवाई कशी करावी असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.