Marathi Leaders in Bihar Elections : विनोद तावडे नितीश कुमारांचं चक्रव्यूह तोडणार?

भाजपनं विविध राज्यातील प्रभारी आणि सहप्रभारी पदाच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यात राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी दोन मराठी नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपविली आहे. विनोद तावडे आणि प्रकाश जावडेकर. नितीश कुमार आणि राहुल गांधी, विरोधकांच्या या दोन्ही भावी पंतप्रधानाचा रथ अडवण्याची जबाबदारी या दोन मराठी नेत्यांकडे दिलीय. पंतप्रधान मोदींनी या दोन नेत्यांची निवड का केलीय जाणून घेऊया...

Updated: Sep 10, 2022, 02:04 PM IST
Marathi Leaders in Bihar Elections : विनोद तावडे नितीश कुमारांचं चक्रव्यूह तोडणार?  title=

रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली: भाजपनं विविध राज्यातील प्रभारी आणि सहप्रभारी पदाच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यात राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी दोन मराठी नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपविली आहे. विनोद तावडे आणि प्रकाश जावडेकर. नितीश कुमार आणि राहुल गांधी, विरोधकांच्या या दोन्ही भावी पंतप्रधानाचा रथ अडवण्याची जबाबदारी या दोन मराठी नेत्यांकडे दिलीय. पंतप्रधान मोदींनी या दोन नेत्यांची निवड का केलीय जाणून घेऊया...

सध्या नितीश कुमार आणि राहुल गांधी राजकीय दृष्ट्या चांगलेच सक्रीय झाले आहेत. एकीकडे नितीश कुमार यांनी विरोधी पक्षातील नेत्यांच्या गाठाभेटी सुरू केल्या आहेत तर दुसरीकडे राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली आहे. या दोघांनाही त्यांच्याच गडात हरवण्याची आणि कमळ उगवण्याची रणनीती भाजपनं आखलीय, ते दोन मराठी नेत्यांवर जोरावर.

मोदींचा तावडेंवर विश्वास

विनोद तावडे यांची बिहारचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. विनोद तावडेंसाठी बिहार नवा नाही. बिहार विधानसभा निवडणूकीत तावडे यांनी तिथे पक्षाचं काम केलं आहे. त्यांच्यावर लालू प्रसाद यादवांचा गड असलेल्या छपरा जिल्ह्याची जबाबदारी दिली होती. या भागातील सर्वच्या सर्व जागा भाजपनं जिंकल्या. तेंव्हा त्यांच्या कामगिरीची प्रशंसा भूपेंद्र यादव आणि अमित शाह यांनी केली. त्याचेच बक्षिस म्हणून तावडेंना हरियाणाचे प्रभारी म्हणून नियुक्त केले. पक्षाच्या चौकटीत राहून शिस्तबद्ध काम केल्यामुळे त्यांच्या गळ्यात महासचिव पदाची माळ पडली. मागील अडीच वर्षापासून पक्षात झोकून देऊन काम केलं. उशीरा का होईना त्याचं फळ मिळालं. तर नुकतेच राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत द्रोपदी मुर्मू यांच्यासोबत प्रत्येक दौ-यात विनोद तावडे दिसले होते. राष्ट्रपतींच्या दौ-याचं नियोजन आणि मतांची गोळाबेरीज अशी जबाबदारी तावडेंवर देण्यात आली होती.

नितीश कुमारांचा रथ कसा रोखणार ?

पण आता भाजपला बिहारचा मार्ग सोपा नाही. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव असं दुहेरी आव्हान भाजपसमोर आहे. तेजस्वी यांची तरूणाईतील क्रेझ आणि विकासाचा चेहरा म्हणून नितीश कुमार यांची वेगळी प्रतिमा आहे. तेजस्वी यादव यांच्या रूपानं ओबीसी मतदाराचं पाठबळ नितीश कुमारांना मिळतंय. बिहार मध्ये काँग्रेस नगण्य असल्यामुळे मुस्लिम मतदारही नितीश आणि तेजस्वीच्या मागे उभा आहे. शिवाय नितीश कुमार भावी पंतप्रधान आणि विरोधकांचे नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. संपूर्ण देशाचं नितीश कुमारांकडे लक्ष लागले आहे. अशावेळी भावी पंतप्रधानांची घोडदौड रोखण्याचं काम विनोद तावडे यांना करावं लागणार आहे. त्या बरोबरच पक्षातील नेतृत्वाची पोकळी भरून काढत पक्ष संघटना वाढविण्याची कसरतही करावी लागणार आहे. नितीश कुमारांची प्रशासनावर असलेला पकड, दारूबंदी मुळे महिलांमध्ये असलेली लोकप्रियता, बिहारी जनतेची नस न् नस माहित असलेला नेता म्हणजे नितीश कुमार. म्हणूनच सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
बिहारमध्ये भाजपचं स्वबळावर कधीच सत्ता आणली नाही. इथलं राजकारण म्हणजे भाजपसाठी चक्रव्यूह आहे. आता हे चक्रव्यूह तोडण्याचं काम विनोद तावडेंना करावं लागणार आहे. यासाठीच पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी विनोद तावडे यांनी निवड केलीय. एक प्रकारे तावडे यांच्यावर मोदींनी मोठी जबाबदारी देत विश्वास व्यक्त केलाय. तावडे बिहारचे चाणक्य बनणार का हे येणारा काळ सांगेल.

दुसरे भावी पंतप्रधान पदाचे उमेदवार राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या राज्यात भाजपचे ज्येष्ठ मराठी नेते प्रकाश जावडेकर यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केलीय. जावडेकर यांचे मंत्रीपद गेल्यानंतर ते अडगळीत पडले होते परंतु आता पुन्हा त्यांच्यावर पक्षानं नवी जबाबदारी दिलीय. राहुल गांधी केरळमधूनच खासदार आहेत. काँग्रेस आणि डावे पक्षांचा पगडा असलेल्या केरळचं आव्हान जावडेकरांच्या खांद्यावर आले आहे. जावडेकर यांचे संघटनकौशल्य आणि वक्तृत्व चांगले आहे. शिवाय अमेठीत भाजपनं राहुल गांधींचा पराभव केल्यानंतर आता केरळकडे मोर्चा वळवला आहे. प्रकाश जावडेकरांना केरळमध्ये कितपत यश मिळतंय पहावं लागेल.

modi trust leaders of maharashtra vinod tawade and prakash javdekar given crutial responsibility of bihar elections