गुजरात : गुजरातमधील जघडिया मतदारसंघातले विद्यमान आमदार छोटूभाई वसावा यांनी सत्ताधारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आपणाला एन्काऊंटर करून ठार मारलं जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केलीय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या राज्यसभा निवडणुकीत आपण काँग्रेसला मदत केली होती. त्यामुळं आपली हत्या होऊ शकते, असा दावा त्यांनी केलाय. तशा आशयाचा व्हिडिओ त्यांनी फेसबुकवर अपलोड केल्यानं एकच खळबळ उडालीय. माझ्या कुटुंबियांना देखील धोका असून, निवडणूक आयोगानं याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी वसावा यांनी या व्हिडिओत केलीय.
वसावा हे २००७ पासून जघडिया मतदारसंघातून जेडीयूच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून येत आहेत. मात्र आता ते जेडीयूमधून बाहेर पडले असून, यंदाच्या निवडणुकीत ते बीटीपीच्या तिकीटवर लढत आहेत.