टी-१ वाघिणीला ठार केल्याने केंद्रीय मंत्री मनेका गांधी संतापल्या

ट्विट करुन संताप केला व्यक्त

Updated: Nov 4, 2018, 06:50 PM IST
टी-१ वाघिणीला ठार केल्याने केंद्रीय मंत्री मनेका गांधी संतापल्या title=

यवतमाळ : पांढरकवडा परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या टी१ वाघिणीला ठार केल्याने वन विभागावर टीकेची झोड उठली असताना केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. मनेका गांधी यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी मी राजकीय आणि कायदेशीर कारवाईचा विचार करत आहे,' असंही मनेका गांधी यांनी ट्विट केलं आहे.

'वाघिणीची हत्या केल्याने मी खूप दु:खी आहे. चंद्रपुरात शहाफत अली खान यानं आतापर्यंत 3 वाघ, 10 बिबट्या, अनेक हत्ती आणि जवळपास 300 रानडुकरांची हत्या केली आहे. अशा माणसाला तुम्ही अमानवी कृत्य करण्यासाठी कसं काय नेमू शकता.' असा सवाल राज्य सरकारला विचारत मनेका गांधी यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे

टी१ वाघिणीला जेरबंद करण्याचा प्रयत्न न करताच तिला गोळ्या घालण्यात आल्या. तसेच तिला मारताना अनेक नियमांचेही उल्लंघन करण्यात आले, असा वन्यप्रेमींचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागकडून रविवारी पहिल्यांदा मौन सोडण्यात आले. वाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, हा प्रयत्न फसला आणि वाघिणीने गस्ती पथकावर हल्ला चढवला. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ वाघिणीवर गोळी झाडावी लागली, असे स्पष्टीकरण वनखात्याने दिले आहे.