'मीच चांद्रयान-3 चा लँडर बनवला' म्हणत मुलाखती देणाऱ्या ठगाला गुजरातमधून अटक

ISRO Fake Scientist Arrested in Gujarat: चांद्रयान-3 मोहिमेतील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यापासून ही व्यक्ती वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांकडे जाऊन मुलाखती देत होती.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 30, 2023, 02:36 PM IST
'मीच चांद्रयान-3 चा लँडर बनवला' म्हणत मुलाखती देणाऱ्या ठगाला गुजरातमधून अटक title=
सूरत पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे

ISRO Fake Scientist Arrested in Gujarat: गुजरातमधील सूरत शहरातील पोलिसांनी मंगळवारी एका व्यक्तीला अटक केली आहे. या अटकेचा संबंध भारतीय अंतराळ संशोधन संस्थेशी म्हणजेच इस्रोशी असल्याने एकच खळबळ उडाली आहे. आपण इस्रोचे वैज्ञानिक असल्याचा दावा करत स्थानिक प्रसारमाध्यमांना या व्यक्तीने मुलाखती दिल्या होत्या. चांद्रयान-3 मधील लँडर मॉड्युअल आपणच डिझाइन केल्याचा दावा हा ठग करत होता. पोलिसांनी या व्यक्तीला आता ताब्यात घेतलं आहे.

कोण आहे ही व्यक्ती?

अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव मिथुल तिवारी असं आहे. 23 ऑगस्ट रोजी भारताच्या चांद्रयान-3 मोहिममधील विक्रम लँडर यशस्वीपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं. विक्रम लँडर उतरल्यानंतर मिथुल तिवारी हा सुरतमधील अनेक स्थानिक प्रसारमाध्यमांकडे जाऊन इस्रोचा शास्त्रज्ञ असल्याप्रमाणे मुलाखती देत होते. आपणच  चांद्रयान-3 मधील लँडर मॉड्युअल डिझाइन केल्याचा दावा मिथुल करत होता. 

बनावट पत्रही तयार केलं

धक्कादायक बाब म्हणजे मिथुलने केलेला बनाव हा केवळ चांद्रयान-3 मधील लँडर मॉड्युअल करण्यापुरताच मर्यादित नव्हता. तो स्वत:ची ओळख इस्रोमधील अन्सिएंट सायन्स अॅप्लिकेशन डिपार्टमेंटचा 'उपाध्यक्ष' अशी करुन द्यायचा. त्याने इस्रोकडून आलेलं बनावट अपॉइण्टमेंट लेटरही तयार करुन घेतलं होतं. या लेटवर त्याची नियुक्ती 26 फेब्रवारी 2022 रोजी करण्यात आल्याचं नमूद केलेलं आहे. हे लेटरही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

इस्रोशी काहीही संबंध नाही

"तपासामध्ये या व्यक्तीला कोणत्याही प्रकारे इस्रोच्या चांद्रयान-3 मोहिमेशी संबंध नसल्याचं उघड झालं आहे. त्याने आपण इस्रोचे कर्मचारी असल्याचा खोटा दावा केला," असं पोलिसांनी मिथुलला ताब्यात घेतल्यानंतर जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. मिथुलने खोटं पत्र सादर करताना इस्रोच्या आगामी 'मर्क्युरी फोर्स इन स्पेस' या मोहिमेसाठी 'स्पेस रिसर्च मेंबर' असल्याचंही भासवलं होतं. 

खोटो मेसेज व्हायरल केले

मिथुलने इस्रोच्या नावाने खोटे मेसेज व्हायरल केले. इस्रोच्या महत्त्वकांशी प्रकल्पामध्ये काहीही योगदान नसताना या व्यक्तीने बनाव केला. या माध्यमातून त्याने इस्रोची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचं पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे. सूरत शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मिथुलविरोधात कलम 419, 465, 468, 471 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर जगभरामध्ये इस्रोची चर्चा आहे. याच चर्चेदरम्यान इस्रोच्या नावाचा वापर करुन सवंग लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न या व्यक्तीने केल्याचं दिसून येत आहे.