बायकोपासून दूर जाण्यासाठी शोधून काढलेला जुगाड तरुणाला पडला महाग... नेमकं काय घडलं?

ही घटना महूच्या छोटी ग्वालटोली पोलिस स्टेशन जवळील सेंट्रल लॅबमधील आहे.

Updated: Jul 3, 2021, 07:46 PM IST
बायकोपासून दूर जाण्यासाठी शोधून काढलेला जुगाड तरुणाला पडला महाग... नेमकं काय घडलं? title=

मध्यप्रदेश( इंदौर) : लोकं आपल्या बायकोपासून लांब राहाण्यासाठी काय करतील याचा काही नेम नाही, मध्य प्रदेशात इंदूर येथील एका तरुणाने आपल्या बायकोपासून दूर राहण्यासाठी कोरोनाचा बनावट रिपोर्ट दाखवला आणि तिला सांगितले की, त्याला कोविड सेंटरमध्ये दाखल केले आहे. परंतु महिनाभरापेक्षा जास्त दिवस उलटले तरी, नवरा घरी परतलाच नाही. तेव्हा बायकोला संशय आला. तिने तिच्या वडिलांना नवऱ्याच्या अहवालाची चौकशी करण्यास सांगितले. वडिलांनी लॅबमधून आपल्या जावयाच्या रिपोर्टची चौकशी केली असता, तो रिपोर्ट बनावट आहे असे त्यांना समजले. त्यानंतर लॅबने शुक्रवारी या तरुणाविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

ही घटना महूच्या छोटी ग्वालटोली पोलिस स्टेशन जवळील सेंट्रल लॅबमधील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लायवुड व्यावसायिकाचा मुलगा अजाज अहमदचे लग्न फेब्रुवारी 2021 मध्ये झाले होते. त्याच्या शारीरिक दुर्बलतेमुळे दोघांचे विवाहित जीवन तणावपूर्ण होत आहे. या कारणामुळे त्याचे नेहमीच बायकोसोबत वाद होत असे, त्यामुळे त्याने बायकोपासून दूर जाण्याचा विचार केला.

यानंतर, अजाज अहमदने 25 मे रोजी फोटोशॉप करुन इंदूरच्या सेंट्रल लॅबमधील एका व्यक्तीचा कोविड पॉझिटिव्ह (covid positive) रिपोर्ट बदलून त्यावर त्याचे नाव टाकले आणि आपल्या कुटूंबाला दाखवले. यामुळे अजाज कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजून पत्नी आणि कुटूंबीय त्याच्यापासून दूर गेले.

एएसपी जयवीरसिंग भदौरिया यांनी सांगितले की, जेव्हा अजाजच्या पत्नीला असा संशय आला की, तो आतापर्यंत ठीक होऊन घरी यायला हवा होता. परंतु एक महिना झाला तरी अजाज घरीच परतला नाही. यानंतर त्याच्या बायकोने तिच्या वडिलांना नवऱ्याच्या कोरोना रिपोर्टची चौकशी करण्यास सांगितले.

वडिलांनी ताबडतोब त्या लॅबच्या टोल फ्री, क्रमांकावर फोन लावला. त्यावेळेस या लॅबने एसआरएफ आयडी नंबर तपासला. तेव्हा लॅब कर्मचाऱ्याच्या लक्षात आले की, कोणीतरी त्यांच्या रिपोर्टमध्ये छेडछाड केली आहे.

त्यानंतर सेंट्रल लॅबचे ऑपरेटर विनिता कोठारी यांनी या रिपोर्टची प्रत मागवून शुक्रवारी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावर पोलिसांनी अजाजविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि त्याचा शोध सुरू केला आहे. परंतु अद्याप अजाजबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.