अबब! रस्त्यावर आंबे विकणाऱ्या तरुणाला एक डजन आंब्यासाठी व्यक्तीनं दिले 1.2 लाख

तुलसी आता पाचवीमध्ये आहे. कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे ऑनलाइन क्लासेस सुरू आहेत. अशा परिस्थितीत आर्थिक चणचण असल्यानं तुलसी स्मार्टफोन घेऊ शकत नव्हती.

Updated: Jun 28, 2021, 11:20 PM IST
अबब! रस्त्यावर आंबे विकणाऱ्या तरुणाला एक डजन आंब्यासाठी व्यक्तीनं दिले 1.2 लाख title=

मुंबई: कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांच्या खाण्यापिण्याची भ्रांत झाली. अनेकांना आपला व्यवसाय नोकरी सोडून पोटापाण्यासाठी दुसरा उद्योग करावा लागला. अशा परिस्थितीमध्ये एका तरुणीला चक्क लॉटरी लागली आहे. पैशांची चणचण भासणाऱ्या या तरुणीनं रस्त्याच्या कडेला आंबे विकण्यास सुरुवात केली. एका व्यक्तीनं या तरुणीकडून एक डजन आंबे घेतले आणि तिला त्याबदल्यात 1.2 लाख रुपये दिले

झारखंडच्या जमशेदपूर येथील एका मुलीला ऑनलाइन वर्ग करण्यासाठी तिला स्मार्टफोनची गरज होती. तिला स्मार्टफोन विकत घ्यायचा होता. 11 वर्षांच्या तुलसी कुमारी रस्त्याच्या कडेला आंबे विकते. इंडिया टाईम्सच्या वृत्तानुसार, अमेय नावाच्या व्यक्तीने या मुलीला अशा अवस्थेत पाहून आश्चर्यचकित झालेय त्यानंतर या व्यक्तीनं तिच्याकडून 1 लाख 20 हजार रुपयांमध्ये 12 आंबे खरेदी केले. म्हणजेच प्रत्येक आंब्यासाठी किंमत दहा हजार रुपये मोजले. बुधवारी अमेयने ही रक्कम मुलीचे वडील श्रीमल कुमार यांच्या खात्यात जमा केली. 

11 वर्षांच्या तुलसीची संघर्षगाथा अमेय यांना सोशल मीडियावरून समजली होती. तिच्याकडे फोन नसल्यानं तिला शिक्षण घेता येत नव्हतं. या मुलीला मदत करण्यासाठी अमेय यांनी मदतीचा हात पुढे केला. ज्यामुळे तुलसीचं शिक्षणही होऊ शकणार आहे. त्यांनी दिलेल्या या पैशांमुळे तुलसीच्या घरच्यांची आर्थिक चणचण कमी होईल असा विश्वास अमेय यांना आहे. अमेय यांच्या कामगिरीनंतर सोशल मीडियावर त्यांचं कौतुक होत आहे. 

तुलसी आता पाचवीमध्ये आहे. कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे ऑनलाइन क्लासेस सुरू आहेत. अशा परिस्थितीत आर्थिक चणचण असल्यानं तुलसी स्मार्टफोन घेऊ शकत नव्हती. ही चणचण दूर करण्यासाठी तिने आंबे विकण्याचा निर्णय घेतला. याची माहिती अमेय यांना समजल्यानंतर त्यांनी तुलसीला मदत केली.