Bhogichi Bhaji: एकदम चटपटीत आणि वेगळ्या चवीची भोगीची भाजी; वाचा रेसिपी, महत्व

Makar Sankranti Special Recipe: संक्रातीची चाहूल लागातच आठवते ती भोगीची भाजी, बाजरीची भाकरी, गूळपोळी आणि तिळाचे लाडू. विविध भाज्या एकत्र करुन केलेली भोगीची भाजी संक्रातीचे विशेष आकर्षण असते. 

Updated: Jan 13, 2023, 10:06 AM IST
Bhogichi Bhaji: एकदम चटपटीत आणि वेगळ्या चवीची भोगीची भाजी; वाचा रेसिपी, महत्व  title=

Bhogichi Bhaji Recipe in Marathi: मकर संक्रांत (Makar Sankranti 2023 )15 जानेवारी 2023 रोजी म्हणजे रविवारी साजरा केला जाणार आहे. देशभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा होतो. पण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा सण म्हणजे भोगी (Bhogi)... या दिवशी भोगीची भाजी बनवण्याची परंपरा असते. तुम्हाला टेस्ट सोबतच आरोग्यासाठी उत्तम असलेली ही भाजी तुम्हालाही बनवायची असेल तर ही रेसिपी जाणून घ्या...

यावेळी भोगी सण हा 14 जानेवारी 2023 ला येत आहे. यादिवशी सकाळच्या वेळी गृहीणींची प्रचंड धावपळ असते. कारण भोगीच्या दिवशी तीळ लावलेल्या भाकऱ्या, भोगीची भाजी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी यांसारखे पौष्टीक पदार्थ तयार करण्यात येतात. या दिवशी भोगीची  भाजी ही विविध प्रकारच्या भाज्या एकत्र करुन त्यात तीळ टाकून चविष्ट भाजी बनवली जाते. तसं बघायला गेलं तर वेगवेगळ्या भागात भोगीच्या भाजीला वेगवेगळी नावे आहेत.  भोगीच्या दिवशी देवराज इंद्र यांची मनोभावे पूजा करण्यात येते. या पुजे मागचं कारण की, शेतात भरपूर प्रमाणात पिक बहरावे यासाठी भोगी दिवशी कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करुन देवाकडे प्रार्थना केली जाते. 

वाचा: ढील दे दे रे! संक्रांतीला पतंग का उडवतात? जाणून घ्या वैज्ञानिक कारण 

भोगीच्या भाजीचं साहित्य 

तेल, मोहरी, जिरे, तीळ, आले-लसुण पेस्ट, हळद, हिंग, लाल तिखट (साधी बिना मसाल्याची चटणी), वांगे, पावटा, घेवडा, हरभरा, गाजर, काच्चे शेंगदाणे, हिरवा वाटाणा, फ्लॉवर, टोमॅटो, शेंगदाण्याचे कूट, कोर्ट्याचे कूट, कांदा-लसूण मसाला चटणी आणि मीठ...    

अशी करा भाजी 

1. सुरुवातीला एका भांड्यात थोडे तेल घेऊन त्यामध्ये मोहरी, जिरे, तीळ टाका. तीळ आणि मोहरी चांगली तडतडू द्यावी. 
2. त्यानंतर त्यामध्ये एक चमचा आले-लसूण पेस्ट टाका. ते तेलात थोडी भाजून घ्या. 
3. यामध्ये एक चमचा हळद आणि थोडीसी हिंग पावडर टाका. 
4. यानंतर विना मसाल्याचे लाल तिखट टाका. यामुळे भाजीला रंग येण्यास सुरुवात होईल. 
5. त्यानंतर सर्व धुवून घेतलेल्या भाज्या (वांगे, पावटा, घेवडा, हरभरा, गाजर, हिरवा वाटाणा, फ्लॉवर, टोमॅटो) त्यामध्ये टाकाव्यात. भाजी टाकताना सर्व मिश्रण हलवत रहावे आणि गॅस मध्यम आचेवर ठेवावा. 
6. सर्व मिश्रण 2 मिनिट नीट परतून झाल्यावर त्यावर कच्चे शेंगदाणे टाकावेत.
7. टाकण्यात आलेल्या सर्व भाज्या झाकण लावून वाफवूण घ्याव्यात. 
8. यामध्ये आवडीनुसार शेंगदाणा कूट, कोर्ट्याचे कूट आणि कांदा-लसूण मसाला चटणी टाकावी आणि शेवटी चवीपुरते मीठ टाकावे.
9. भाजी एकजीव केल्यानंतर सगळे मसाले एकत्र झाले की आपल्याला भाजी सुकी हवी की पातळ यानुसार त्यामध्ये बाजूला गरम केलेले पाणी टाकायचे. 
10. सर्व भाज्या शिजवण्यासाठी 5-7 मिनिटे झाकण लावून मध्यम आचेवर ठेवावे. त्यानंतर ही भोगीची भाजी तयार आहे.