रांची : भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी फादर स्टेन स्वामीच्या रांची इथल्या घरावर छापा मारला. याआधीही २९ ऑगस्टला स्टेन स्वामीच्या घरी पुणे पोलिसांनी छापा टाकला होता. त्यावेळी स्वामीची त्याच्या घरी चौकशीही करण्यात आली. मात्र त्याला पोलिसांनी अटक केली नव्हती. देशभरात डाव्या विचारसरणीच्या विचारवंतांच्या घरावर पोलिसांनी एल्गार परिषदेनंतर छापे टाकले होते. यावेळी पाच विचारवंतांना अटकही करण्यात आली होती. त्यात स्टेन स्वामीच्या घरावरही छापा टाकण्यात आला होता.
स्टेन यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फादर स्टेन स्वामी मुळचे केरळचे रहिवासी आहेत. गेल्या ५० वर्षांपासून ते झारखंडमध्ये राहत आहेत. त्यांनी चाईबासामध्ये राहून आदिवासी संघटनांसाठीही काम केलंय. २००४ मध्ये झारखंडची निर्मिती झाल्यानंतर ते रांचीला आले. 'नामकुंम बगेईचा' या आदिवासींच्या अधिकारासाठी काम करणाऱ्या संघटनेत त्यांनी काम केलं. सध्या झारखंडच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतील आदिवासी कैद्यांसाठी ते काम करत आहेत. स्टेन समर्थकांच्या म्हणण्यानुसार, नक्षलवादाचा ठपका ठेवून तरुंगात टाकण्यात आलेल्या आदिवासींसाठी फादर स्टेन काम करत आहेत. स्टेन यांची ओळख एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आहे.