गोरखपूरला निघालेली श्रमिक रेल्वे पोहोचली ओडिशात

 मजुरांना घेऊन जाणारी रेल्वे उत्तर प्रदेशात जाण्याऐवजी ओडिशाला पोहोचली आणि एकच गोंधळ झाला.  

Updated: May 23, 2020, 02:35 PM IST
गोरखपूरला निघालेली श्रमिक रेल्वे पोहोचली ओडिशात  title=
ANI Photo

मुंबई : कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजुरांचे हाल होऊ लागल्याने अखेर त्यांना मूळ गावी जाता यावे म्हणून काही रेल्वे सोडण्यात आल्यात. मात्र, अशीच एक मजुरांना घेऊन जाणारी रेल्वे उत्तर प्रदेशात जाण्याऐवजी ओडिशाला पोहोचली आणि एकच गोंधळ झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असताना रेल्वे गोरखपूर येथे न जाता ओडिशाला पोहोचल्याने गोंधळ निर्माण झाला. आता ही रेल्वे पुन्हा गोरखपूरला रावना करण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. अशा संकटकाळात हाताला काम-धंदा  नसल्याने पैसे नव्हतेत. तसेच रोजगार नसल्याने श्रमिकांनी पायी आपल्या गावची वाट धरली होती. त्यांच्यासाठी एसटी आणि रेल्वेची सेवा सुरु करण्यात आली. एसटीने मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात आले. तर श्रमिक रेल्वे सुरु करुन या पायी जाणाऱ्या मजुरांना मूळ गावी सोडण्यात येत आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून श्रमिक रेल्वे सुरु केली. काल गुरुवारी  महाराष्ट्रातील वसई रोड स्थानकावरून उत्तर प्रदेशमधील गोरखपूर या ठिकाणी जाण्यासाठी श्रमिक रेल्वे निघाली होती. परंतु ती रेल्वे उत्तर प्रदेशात पोहोचण्याऐवजी ७५० किलोमीटर दूर ओडिशामध्ये पोहोचली. तोपर्यंत रेल्वे मोटरमनला काहीही समजले नाही. दरम्यान यामुळे प्रवाशांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर ही रेल्वे गोरपूरकडे रवाना करण्यात आली.

ही रेल्वे आपला मार्ग सोडून दुसरीकडे गेली अशा चर्चांनाही सुरु झाली होती. परंतु त्यावर आता रेल्वे प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ही रेल्वे आपला मार्ग सोडून अन्य ठिकाणी गेली नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आम्ही याबाबत एक चाचपणी केली आणि तो एक नियोजनाचा भाग होता, असे सांगण्यात आले आहे.