Maha Shivratri 2023 : देवादिदेव महादेवाची आराधना करत सृष्टीच्या या निर्मात्याचे आशीर्वाद मिळवण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी अनेकजण उपवास करतात. आपआपल्या परिनं शंकरापुढं नतमस्तक होत चांगल्या आयुष्याची कामना करतात. (lord shiva) शंकराला भोळा किंवा सांब सदाशिव म्हणूनही संबोधलं जातं. अशा या शंकराची अनेक मंदिरं भारतात आहेत. प्रत्येक मंदिराचं महत्त्वं विविधरंगी आहे. असंच एक मंदिर देशोदेशीच्या भाविकांसाठी आकर्षण आणि कुतूहलाचा विषय असतं. ते म्हणजे मध्य प्रदेशातील उज्जैन (Ujjain) येथे असणारं महाकालेश्वराचं मंदिर (Mahakaleshwar temple).
बारा ज्योतिर्लिंगांपैकी (12 jyotirlinga) एक असणाऱ्या या मंदिरात दररोज बाबा महाकालेश्वरांना विविधरुपी वेशभूषा केली जाते. दर दिवशी या मंदिरात भस्मारती होते. हो तुम्ही बरोबर वाचलंत. भस्मारती. प्राचीन काळापासून इथं ही परंपरा सुरु आहे. शिवपुराणात त्यामागच्या कारणाचा उलगडा केला आहे.
असं म्हणतात की भस्म हेच शंकराचं मुख्य वस्त्र आहे. त्यामुळं देवाचं संपूर्ण शरीर भस्मानं अच्छादलेलं असतं. शिवपुराणात सांगितल्यानुसार भस्म हेच पृथ्वीचं सार आहे. एक ना एक दिवस संपूर्ण सृष्टीच या भस्मात सामावली किंवा रुपांतरी केली जाईल. त्यामुळं हे भस्म महाकालेश्वराच्या पिंडीवर लावलं जातं. (baba mahakal bhasma aarti video)
भस्माचे आणखी गुणधर्म म्हणजे त्यामुळं शरीरावरील छिद्रं बंद होतात. परिणामी थंडी आणि उष्णतेचा शरीरावर परिणाम होत नाही. त्वचेच्या विकारांवरही भस्म म्हणजे रामबाण उपाय. देवादिदेव महादेवाचा वावर कैलासात असल्यामुळं हेच भस्म असल्यामुळं तेथील बोचऱ्या थंडीला देवाला त्रास होत नाही असं म्हणतात. परिस्थितीप्रमाणं स्वत:ला बदला हाच संदेश खुद्द महादेव हे भस्मलेपन करून सर्वांना देत असतात अशीही मान्यता आहे.
असं म्हणात की शंकराच्या शरीरावर असणारं भस्म हे त्यांची अर्धांगिनी देवी सती यांच्या चितेतील होतं. आपल्या पित्याकडूनच पतीला अपमानित होताना पाहून सतीनं यज्ञकुंडात देहत्याग केला होता. भगवान शंकरापर्यंत ही वार्ता पोहोचली आणि त्यांनी सतीच्या देहाला कुंडातून काढत तांडव सुरु केला. संपूर्ण विश्व पालथं घातलं. जिथंजिथं देवी तीच्या शरीराचे भाग स्थिरावले तिथेतिथे शक्तीपीठं स्थापित झाली. पण, तरीरी देवाचा क्रोधाग्नी शमला नव्हता. पुराणकथांमध्ये सांगितल्यानुसार भगवान विष्णूनं सतीच्या शरीराला भस्मात परावर्तित केलं आणि या विरहामध्ये शंकरानं हे भस्म सतीची अखेरची आठवण म्हणून आपल्या संपूर्ण शरीरावर लावलं. तेव्हापासूनच हे नातं अतुट आहे असं सांगितलं जातं.
उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात होणाऱ्या भस्मारतीसाठी एकेकाळी स्मशानातील भस्म आणून आरती केली जायची असंही म्हटलं जातं. ज्या शरीराची आपण इतकी काळजी घेतो, ज्यामुळं अनेकदा गर्व दाखवतो तेच शरीर एक दिवस भस्मसात होणार आहे हेच देवावर अच्छादलं जाणारं हे भस्म सांगत असतं.