मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी नवा फॉर्म्युला?

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बुधवारी झाली. त्यामध्ये मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार राहुल गांधी यांच्याकडे सोपविण्यात आला.

Updated: Dec 13, 2018, 11:42 AM IST
मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी नवा फॉर्म्युला? title=

नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत अखेर काँग्रेसने सत्तेची पायरी गाठली. बहुजन समाज पक्षाच्या मदतीने काँग्रेस राज्यात सत्तेवर येणार आहे. आता मुख्यमंत्री कोण होणार, हा कळीचा प्रश्न बनला आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बुधवारी झाली. त्यामध्ये मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार राहुल गांधी यांच्याकडे सोपविण्यात आला. पक्षाने या बैठकीत कमलनाथ यांच्याच नावाला पसंती दिली असल्याची माहिती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी दिल्लीत गुरुवारी दिवसभर बैठक घेणार आहेत. मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी नवा फॉर्म्युला आणण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये पक्षाच्या दुसऱ्या वरिष्ठ नेत्याला उपमुख्यमंत्री केले जाऊ शकते. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावाची यासाठी चर्चा आहे.

दिल्लीतील बैठकीसाठी कमलनाथ यांच्यासह पक्षाचे राज्यातील ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे हे सुद्धा दाखल झाले आहेत. या बैठकीत मुख्यमंत्रीपदासोबत मंत्रिपदी कोणाला संधी द्यायची त्यांचीही नावे निश्चित करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी करायचा, याचाही निर्णय याच बैठकीत केला जाणार आहे. या बैठकीपूर्वीच मध्य प्रदेशातून आलेल्या काही नेत्यांनी अहमद पटेल यांचीही भेट घेतली. त्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कोण असेल, हे पक्ष लवकरच निश्चित करेल. मध्य प्रदेशात निवडून आलेल्या काँग्रेसच्या आमदारांकडून त्यांचे मत मागविण्यात आले आहे. त्यातच गुरुवारी दुपारी चार वाजता मध्य प्रदेशात काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. याच बैठकीत मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याचे नाव जाहीर केले जाईल. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस उपमुख्यमंत्रीपद कोणाला तरी देण्याची शक्यता आहे. कमलनाथ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देण्यात आले, तर उपमुख्यमंत्रीपदी ज्योतिरादित्य शिंदे यांना संधी देण्यात येईल. यावर अंतिम निर्णय राहुल गांधीच घेणार आहेत.