भोपाळ : कायम चर्चेत असणाऱ्या काश्मीर प्रश्नावर मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या (एमपीपीएससी) पूर्व परीक्षेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावरून मोठा वाद निर्माण झाला असून, राजकीय स्तरातून देखील तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
माहितीनुसार, पूर्व परीक्षेत असा प्रश्न विचारला होता की, “भारताने काश्मीर पाकिस्तानला द्यावे का?" ही बाब समोर आल्यानंतर पेपर सेट करणाऱ्यांमध्ये सहभागी असलेल्या आयोगातील दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
एमपीपीएससीने 19 जूनला पूर्व परीक्षा घेतली होती. या परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तराचे चार पर्याय दिले होते आणि त्यानंतर दोन युक्तिवाद होते.
भारताने काश्मीर प्रांत पाकिस्तानला देण्याचा निर्णय घ्यावा का?
युक्तिवाद 1: होय, यामुळे भारताचा खूप पैसा वाचेल;
युक्तिवाद 2: नाही, अशा निर्णयामुळे अशा मागण्या आणखी वाढतील.
उत्तराचे हे चार पर्याय होते -
(A) युक्तिवाद 1 सामर्थ्यवान,
(B) युक्तिवाद 2 सामर्थ्यवान,
(C) युक्तिवाद 1 आणि 2 दोन्ही सामर्थ्यवान आहेत,
(D) युक्तिवाद 1 आणि 2 दोन्ही सामर्थ्यवान नाहीत.
या वादग्रस्त प्रश्नाची बाब समोर आल्यावर राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, "MPPSC परीक्षेत काश्मीरशी संबंधित वादग्रस्त प्रश्न विचारण्याचा संदर्भ हा आक्षेपार्ह आहे. वादग्रस्त प्रश्न विचारणारे पेपर सेटर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील होते. त्यांना मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाने (एमपीपीएससी) भविष्यात प्रश्नपत्रिका निर्मिती करण्याच्या प्रक्रियेपासुन दुर करण्यात आलं आहे."
ते म्हणाले की, पीएससी आणि उच्च शिक्षण विभागाला या दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितल आहे, तसेच यांना निलंबित करण्यात आलं आहे आणि त्यांना कोणतही काम देऊ नये असं देखील सांगण्यात आलं आहे.
हे लक्षात घ्यायला हवं की सरकारने वेळोवेळी काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील. काश्मीरवर भारताबाहेरील राष्ट्राला कोणीही कोणतीही टिप्पणी, मत किंवा हस्तक्षेप स्पष्टपणे सरकारने नाकारला आहे.