अमृतसर : अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात इतर भाविकांप्रमाणे नतमस्तक होणारी आणि भांडी घासणारी ही व्यक्ती कोण? हे माहीत पडल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
ही व्यक्ती म्हणजे लंडनचे महापौर सादिक खान आहेत... बुधवारी श्री दरबार साहिबमध्ये ते दाखल झाले होते.. त्यांच्या स्वागतासाठी मोठी बडदास्त ठेवण्यात आली असली तरी त्यांनी इथं इतर भाविकांप्रमाणे अत्यंत साधेपणानं स्वयंपाकघरात सेवा केली आणि लंगरचा आस्वादही घेतला.
सादिक खान यांची सुवर्ण मंदिराला ही पहिलीच भेट होती. ते सध्या भारत पाकिस्तानच्या संयुक्त दौऱ्यावर आहेत.
इतकंच नाही तर ब्रिटिश काळात अधिकाऱ्यांकडून झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडावर सादिक खान यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासमोर माफीही मागितली. अमरिंदर सिंह यांनीही या माफिचं स्वागत करत 'ही माफी हत्याकांडातील नरसंहारात मारल्या गेलेल्या कुटुंबांच्या जखमेवर फुंकर घालू शकेल' अशी आशा व्यक्त केली.
यावेळी लंडन आणि पंजाबच्या सुधारलेल्या संबंधांवर सादिक खान आणि अमरिंदर सिंह यांनी चर्चाही केली.