Election Commission Action Against Money Power: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी पार पडत आहे. महाराष्ट्रातील 5 मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रचारसभा, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू झाल्यापासून पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडण्याआधीपर्यंत केलेल्या वेगवेगळ्या कारवायांसंदर्भातील धक्कादायक तपशील दिला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याआधीच 2019 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा अधिक रक्कम निवडणूक आयोगाने आत्तापर्यंत जप्त केल्याचं आकडेवारीमधून स्पष्ट झालं आहे.
1 मार्च 2024 ते 13 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये देशभरामधून निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या कारवायांमध्ये 4 हजार 658 कोटी 13 लाख रुपये जप्त केले आहेत. यामध्ये रोख रक्कमेबरोबरच सोने-चांदी, दारु, अंमली पदार्थ आणि मौल्यवान वस्तूंचा समावेश असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. भारतामध्ये 1952 सालापासून सुरु झालेल्या निवडणुकीच्या इतिहासाचा विचार करता मागील 75 वर्षांच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात जप्त केलेल्या रक्कमेच्या आकडेवारीनुसार आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. 2019 च्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये एकूण 3 हजार 475 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या निवडणुकीदरम्यान जप्त करण्यात आलेल्या रक्कमेची सरासरी काढली तर रोज 100 कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या एकूण रक्कमेपैकी 44 टक्के वाटा हा अंमली पदार्थांचा असल्याचंही निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
केंद्रीय निवडणूक आय़ोगाने 16 मार्च रोजी निवडणुकीची घोषणा केली. निवडणुकीची घोषणा केल्याच्या क्षणापासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीची घोषणा करताना, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी, "धनशक्ती किंवा बाहूबळाचा वापर निवडणुकीत होणार नाही, चुकीची माहिती पसरवली जाणार नाही आणि आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल," असा विश्वास व्यक्त केला होता.
देशातील पहिल्या टप्प्यामधील मतदान 19 एप्रिल रोजी पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 21 राज्यांमधील 102 जागांसाठी मतदान होणार असून यात महाराष्ट्रातील 5 जागांचा समावेश आहे. ज्यात विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघाचा समावेश आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण 97.6 कोटी मतदार मतदानासाठी पात्र आहेत. एकूण 44 दिवस निवडणुकीचा कार्यक्रम पार पडणार असून त्यात 7 पट्ट्यांमध्ये मतदान होणार आहे. शेवटच्या टप्प्याचं मतदान 1 जून रोजी होणार असून मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे.