'बीफ'च्या आरोपावरून मॉब लिंचिंग, पोलिसांनी गुन्हा केला दाखल

फेसबुकवरून हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Updated: Apr 9, 2019, 01:59 PM IST
'बीफ'च्या आरोपावरून मॉब लिंचिंग, पोलिसांनी गुन्हा केला दाखल title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९ ऐन तोंडावर आली असताना देशात पुन्हा एकदा मॉब लिंचिंगची (जमावाकडून हिंसाचार) घटना घडल्याचं समोर येतंय. आसाममध्ये बीफ विकण्याच्या आरोपावरून जमावानं एका व्यक्तीवर हल्ला केला. बिश्वनाथ चारीली भागात ही घटना घडल्याचं समजतंय. 'द क्विंट'नं दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ७ एप्रिल रोजी ही घटना घडली. पीडित व्यक्तीचं नाव शौकत अली असून त्याला करण्यात आलेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. फेसबुकवरून हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावरून समोर आलेल्या व्हिडिओत जमाव एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहे. ज्याला मारहाण होतेय ती व्यक्ती गेल्या ३५ वर्षांपासून या व्यावसायात आहे. शौकत आठवडी बाजारात मांसाचं दुकान चालवतो. जमावानं मात्र त्याच्या दुकानात बीफ असल्याचा आरोप करत त्याच्यावर हल्ला केला. जखमी शौकतवर एका स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Assam beef mob
सौ. यूट्यूब

तू बांग्लादेशी आहेस का? तुझ्याकडे परवाना आहे का? असे अनेक प्रश्न जमावाकडून शौकतला विचारण्यात येत आहेत, असंही व्हिडिओतून दिसून येतंय.

तसंच दुसऱ्या एका व्हिडिओत जमावाकडून शौतकला एका पॅकेटमध्ये असलेलं मांस खाण्यासाठी जबरदस्ती केली जातेय. यामध्ये डुक्कराचं मांस (पोर्क) असल्याचा दावा करण्यात येतोय. 

पशुधन कायदा १९५०

आसाममध्ये पशुधन कायदा १९५० अस्तित्वात आहे. याद्वारे १४ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या जनावरांना कापण्याची परवानगी देण्यात आलीय. परंतु, यापूर्वी पशु चिकित्क, राज्य पशु कल्याण किंवा पशु पालन विभागाकडून प्रमाणपत्र घेणं बंधनकारक आहे. आसामचं वैशिष्ट्य म्हणजे, या राज्यात इतर राज्यांप्रमाणे गाय, बैल, म्हैस इत्यादी प्राण्यांमध्ये फरक केला जात नाही. अर्थातच आसाममध्ये बीफवर बंदी नाही.