काँग्रेसच्या सात खासदारांचे लोकसभेतील निलंबन मागे

काँग्रेसच्या सात खासदारांचे निलंबन मागे घेतले.

Updated: Mar 12, 2020, 03:39 PM IST
काँग्रेसच्या सात खासदारांचे लोकसभेतील निलंबन मागे title=

नवी दिल्ली : लोकसभेत अर्थसंकल्प अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशानात दिल्ली हिंसाचारावरुन विरोधी पक्षातील काँग्रेस  ( Congress ) खासदारांनी भाजप सरकारला घेरताना गोंधळ घातला होता. दिल्ली हिंसाचाराचा मुद्दा लावून धरला होता. यावेळी संसदेचे काम नीट होऊ शकले नव्हते. त्यावेळी दोनवेळा सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. यामुळे गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या सात खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले होते.(suspension of seven Congress Lok Sabha MP) 

दिल्ली हिंसाचार मुद्द्यावरुन विरोधी पक्षाकडून लोकसभेत प्रचंड गदारोळ करण्यात आला. ज्यामध्ये अध्यक्षांच्या दिशेने कागदपत्रही भिरकावण्यात आली. विरोधी पक्षाच्या खासदारांची ही वागणूक पाहता त्यांना बुधवारी निलंबनाची ताकिदही देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा गुरुवारी कोरोना व्हायरस आणि दिल्ली हिंसाचाराच्याच मुद्द्यावरुन विरोधकांनी गोंधळ घालला होता.

लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या सात खासदारांना ( Congress MP) निलंबित केले होते. संसद अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित केलेल्या काँग्रेसच्या सात सदस्यांवरचे निलंबन लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी मागे घेतले. गैरवर्तनाबद्दल गौरव गोगोई, टी एन प्रथपन, डीन कुरिआकोसे, मानिकाम टागोर, गुरजित सिंग औजला, राजमोहन उन्निथन आणि बेन्नी बेहनन यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

संसद सदनाची कारवाई सुरु झाल्यानंतर दोन वेळा कामकाज तहकूब करावे लागले होते. चर्चेदरम्यान काँग्रेसनेते अधिररंजन चौधरी यांनी काँग्रेस खासदारांचे निलंबन मागे घ्या, अशी मागणी केली होती. चर्चेनंतर संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी निलंबन मागे घेण्याचा ठराव मांडला. हा ठराव सभागृहाने मंजूर केला. त्यानंतर निलंबन मागे घेतले. यानंतर काँग्रेसच्या खासदारांना संसदेत जाता आले.

0