Loksabha Election Voting Phase 7 : आज मतदानाचा अखेरचा टप्पा; 57 जागांसाठी चुरस, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Nivadnuk 2024 Phase 7 Voting: कोणाची प्रतिष्ठा पणाला? जाणून घ्या सातव्या टप्प्यातील मतदानासंदर्भातील महत्त्वाची बातमी. कोणकोणत्या मतदार संघांमध्ये होतंय मतदान?  

सायली पाटील | Updated: Jun 1, 2024, 09:53 AM IST
Loksabha Election Voting Phase 7 : आज मतदानाचा अखेरचा टप्पा; 57 जागांसाठी चुरस, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला   title=
Loksabha election 2024 seventh phase voting day up bihar west bengal varanasi pm modi bjp congress tmc latst update

Loksabha Election 2024 Phase 7 Voting: लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी संपूर्ण देश सज्ज असून, या टप्प्यामध्ये 7 राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशातील 57 जागांसाठी मतदान घेतलं जात आहे. देशातील निवडणुकीचा हा अखेरचा टप्पा अतिशय महत्त्वाचा ठरणार असून, यामागं कारण ठरत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. वाराणासी येथील ज्या मतदारसंघातून मोदी निवडणुकीच्या रिंगणात आहेत तिथंही शनिवारीच मतदान होत असल्यामुळं राजकीय वर्तुळाच्या नजरा याच जागेकडे लागल्या आहेत. 

वाराणासीव्यतिरिक्त पंजाबच्या सर्व 13 जागा, हिमाचल प्रदेशातील 4, उत्तर प्रदेशातील 13, पश्चिम बंगालमधील 9, बिहारच्या 8, ओडिशातील 6 आणि झारखंडमधील 3 जागांवर मतदान पार पडत आहे. फक्त लोकसभाच नव्हे, तर, 1 जून अर्थात शनिवारी ओडिशा आणि हिमाचल प्रदेशात अनुक्रमे 42 आणि 6 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूकही पार पडत आहे. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या या अखेरच्या टप्प्यामध्टये एकूण 904 उमेदवार रिंगणात असून, यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी, लालू प्रसाद यांची कन्या मीसा भारती, अभिनेत्री कंगना रणौत, रवि किशन, निशिकांत दुबे ही नावं रिंगणात आहेत. 

कशी आहे मतदारांची विभागणी? 

सातव्या टप्प्यातील मतदानासाठी  5.24 पुरुष आणि 4.82 कोटी महिला अशी मतदारांची विभागणी असून, याशिवाय 3574 तृतीयपंथी मिळून एकूण 10.60 कोटींहून अधिक मतदार या मतदान प्रक्रियेचा भाह असतील. सातव्या टप्प्यातील मतदानासमवेत देशात 19 एप्रिलपासून सुरु झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेची सांगता होणार आहे. पुढील काही दिवसांत म्हणजेच 4 जून रोजी या महत्त्वाकांक्षी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून,  देशाच कोणाची सत्ता असणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : कोकणात उष्ण दमट हवामानाचा इशारा; मान्सूनची प्रतीक्षा लांबली की थांबली?  

सहाव्या टप्प्यात कसं होतं मतदानाचं चित्र? 

निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार सातव्या टप्प्यातील निवडणुकीसाठीचं मतदान पार पडल्यानंतर शनिवारी सायंकाशळी 6.30 वाजल्यापासून वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांना एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर करता येणार आहे. टप्प्यांनुसार मतदानाची आकडेवारी पाहायची झाल्यास देशात पहिल्या टप्प्यात एकूण 66.14 टक्के, दुसऱ्या टप्प्यात 66.71 टक्के, तिसऱ्या टप्प्यात 65.68 टक्के, चौथ्या टप्प्यात 69.16 टक्के, पाचव्या टप्प्यात 62.2 आणि सहाव्या टप्प्यात 63.36 टक्के इतकं मतदान झालं. मतदानाची टक्केवारी यंदाच्या वर्षी तुलनेनं कमी असल्याचं आढळून आलं त्यामुळं आता मतदारांनी नेमका कौल कुणाला दिला हे पाहणं महत्त्वाचं असेल.