नवी दिल्ली : ओडिशाच्या कोरापूटमध्ये एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी हा चौकीदार आलाय' अशा शब्दांत जनतेला साद घातली. कोरापूट आणि ओडिशाच्या शहिद नायकांनाही यावेळी पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली वाहिली. २०१४ साली मी जेव्हा ओडिशाच्या लोकांसमोर आलो होतो तेव्हा पूर्ण प्रामाणिकपणे तुमची सेवा करणार असं सांगितलं होतं. तुमचा प्रधानसेवक म्हणून मी काम करण्याचा प्रयत्न करत आहे. या पाच वर्षांत तुम्ही दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी तुमचा आभारी आहे, असंही पंतप्रधानांनी म्हटलं.
माझ्या पाच वर्षांच्या यशाचं संपूर्ण श्रेय जनतेलाच आहे. जनता टाळ्यांनीच विरोधकांचा आवाज बंद करेल, असंही त्यांनी उपस्थितांना संबोधत म्हटलं.
विरोधकांवर टीका करत, भारत जेव्हा दहशतवाद्यांवर कारवाई करतो, जेव्हा दहशतवाद्यांना घरात घुसून मारतो तेव्हा हे लोक पुरावे मागतात. भारतीय सेनेनं पाकिस्तानला तोंडावर पाडलंय. जनतेला भारतीय सेनेवर संपूर्ण विश्वास आहे परंतु, आमच्या विरोधकांना नाही. एक महिना झालाय पाकिस्तान मृतदेह मोजतंय आणि हे पुरावे मागतायत अशा शब्दांत टीका केली.
जनेतेला निर्णय घेणारं सरकार हवं, की केवळ नारेबाजी करणारं हे जनतेनंच ठरवावं, असं आवाहनही मोदींनी ओडिशाच्या जनतेला केलं.