वाराणसीत पंतप्रधान मोदींना कोणाचे आव्हान ? जाणून घ्या

 काँग्रेस आणि आम आदमी पक्ष पंतप्रधान मोदींचे आव्हान पेलणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Updated: Apr 25, 2019, 01:47 PM IST
वाराणसीत पंतप्रधान मोदींना कोणाचे आव्हान ? जाणून घ्या  title=

वाराणसी :  २०१४ मध्ये वाराणसी मतदारसंघात विजय मिळवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय राजकारणाच्या क्षितीजावर पाऊल ठेवले. वाराणसी लोकसभा मतदार संघात रोहानिया, वाराणसी उत्तर, वाराणसी दक्षिण, वाराणसी छावणी आणि शिवपुरी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. वाराणसीतून ७ वेळा काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत तर सहा वेळा भाजपाचे उमेदवार विजयी झालेत. त्यामुळे हा मतदारसंघ पंतप्रधान मोदी आणि काँग्रेससाठीही प्रतिष्ठेचा बनला आहे.

काहीवेळापुर्वीच काँग्रेस पार्टीने वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात उमेदवाराची घोषणा केली आहे. या जागेवर प्रियंका गांधी वाड्रा या उभ्या राहणार असल्याची चर्चा होती. पण काँग्रेस पार्टीने या जागेवर अजय राय यांचे नाव पुढे केले आहे. अजय राय याआधीही या जागेवरून काँग्रेसचे उमेदवार राहीले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ते तिसऱ्या स्थानी होते. तर 2009 च्या लोकसभा निवडणुकीतही ते तिसऱ्या स्थानीच होते. 

१९९१ च्या विजयानंतर वाराणसीवर भाजपाने पकड भक्कम केली आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी इथून निवडणूक लढवली. त्यात मोदींना ५ लाख, ८१ हजार २२ मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना २ लाख ९ हजार मतांवर समाधान मानावे लागले होते. २०१४ मध्ये काँग्रेसच्या अजय राय यांना अवघी ७४ हजार मत मिळाली होती. २०१४ मध्ये वाराणसीतून मोदींनी तब्बल ३ लाख ७१ हजार मतांनी विजय मिळवला होता. आता काँग्रेस आणि आम आदमी पक्ष पंतप्रधान मोदींचे आव्हान पेलणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.