लॉकडाऊन वाढवण्याच्या बाजुने किती राज्य ? पंतप्रधानांकडे केली मागणी

अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली

Updated: May 12, 2020, 06:51 AM IST
लॉकडाऊन वाढवण्याच्या बाजुने किती राज्य ? पंतप्रधानांकडे केली मागणी title=

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांसोबत पाचव्या वेळेस चर्चा केली. कोरोना गावांमध्ये पोहोचता कामा नये असे आवाहन यावेळी पंतप्रधानांनी केले. यावेळी अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली. तर काही राज्य लॉकडाऊन वाढवू नये या मागणीवर ठाम होते. 

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी सल्ला मागितला. विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यावर आपल्या सूचना मांडल्या. लॉकडाऊन संदर्भात विषय आल्यावर सध्या लॉकडाऊन सुरुच राहावा अशी मागणी काही मुख्यमंत्र्यांनी केली. 

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी लॉकडाऊन पुढे वाढवण्याची मागणी केली. आर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी योजना आखावी या मागणीवर त्यांनी जोर दिला. एग्झिट प्लान बनवण्याची मागणी देखील त्यांनी केली.

मुख्यमंत्री ठाकरे काय म्हणाले ? 

अमरिंदर सिंह यांच्याव्यतिरिक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली. लॉकडाऊन वाढवल्याशिवाय पुढे जाणं शक्य नसल्याचं ते म्हणाले. जूनमध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लॉकडाऊनवर कोणताही निर्णय हा विचारपूर्वक व्हायला हवा असे ते म्हणाले. 

लॉकडाऊन दोन आठवड्यांसाठी वाढवावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती. तसेच अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसाठी ट्रेन सुरु करण्याची मागणी देखील त्यांनी केली. एका राज्यातून इतर राज्यांमध्ये स्थलांतरित होणाऱ्या मजुरांची चाचणी होणं गरजेचं असल्याचे ते म्हणाले.

ममता बॅनर्जींचा हल्लाबोल 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर बोट ठेवले. केंद्र सरकारने आता ट्रेन आणि विमान सेवा सुरु केली आहे मग लॉकडाऊन वाढवण्याचा काय अर्थ ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पश्चिम बंगालला लक्ष्य केले जात आहे. केंद्राची सूचना आमच्यापर्यंत पोहोचण्याआधीच लीक कशी होते ? हा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यावेळी सर्व आर्थिक गतिविधी सुरु करण्याची मागणी केली. कंटेन्मेंट झोन व्यतिरिक्त सर्व जागांवरी गतिविधी सुरु ठेवावी असे केजरीवाल म्हणाले. 

आर्थिक व्यवहार सुरु ठेवण्यासंदर्भात राज्यांना निर्णय घेण्याची मुभा द्यावी अशी मागणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केली आहे. तसेच मनरेगाचे काम करणाऱ्या मजुरांना दोनशे दिवसांची मजुरी देण्याची मागणी देखील यावेळी त्यांनी केली.

पंतप्रधान काय म्हणाले ?

पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊन वाढवायचा की नाही, हा निर्णय राज्यांवरच सोपवला आहे. यावेळी मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना भविष्यातील खडतर आव्हानाची कल्पनाही दिली. आतापर्यंत भारताने कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवले आहे. मात्र, आगामी काळातही राज्यांनी आपल्या लक्ष्यापासून न ढळता सक्रियपणे काम केले पाहिजे. शहरातून गावापर्यंत कोरोना पोहोचू नये, याची काळजी घ्यायला पाहीजे. हे मोठे आव्हान आहे. लोक घराकडे निघाले आहेत हा मानवीय भाग आहे. घराकडे जाण्याची ओढ असते. लोक अडकल्यामुळे काही नियम शिथिल करावे लागले. परंतु ग्रामीण भागात कोरोना पोहोचणार नाही, याची खबरदारी घ्या, असा सल्ला मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना दिला.