या राज्यात लॉकडाऊन कालावधीत 12 जुलैपर्यंत वाढ

 आता या राज्यात लॉकडाऊनच्या (Lockdown) कालावधीत 12 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 

Updated: Jul 5, 2021, 10:30 AM IST
या राज्यात लॉकडाऊन कालावधीत 12 जुलैपर्यंत वाढ title=

मुंबई : देशात कोरोना रुग्णसंख्येत (Coronavirus) घट दिसून येत आहे. मात्र, कोणताही धोका नको म्हणून अनेक राज्यात काही निर्बंध कायम आहेत. अनलॉक (Unlock) करण्यात आल्यानंतरही हे निर्बंध कायम आहे. तर काही ठिकाणी कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. देशात उत्तर प्रदेश आणि दिल्लीत अनलॉकमध्ये आणखी काही सूट देण्यात आली आहे. मात्र, असे असताना आता तमिळनाडू राज्यात लॉकडाऊनच्या (Lockdown) कालावधीत 12 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. (Lockdown period extended till July 12 in Tamil Nadu)

राज्यातल्या टाळेबंदीचा कालावधी 12 जुलैपर्यंत वाढवल्याचं तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी जाहीर केले. मात्र हे करताना काही निर्बंध शिथिलही केले आहेत. राज्यातल्या कोरोना स्थितीबाबत झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, राज्यांतर्गत प्रवास करण्यासाठी ई पासची आवश्यकता नसेल, असे तामिळनाडू राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.

तमिळनाडूमध्ये लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ करण्यात आला तरी जम्मू-काश्मीरमध्ये आजपासून अनलॉकचे नवे नियम लागू झाले आहेत. केंद्रशासित प्रदेशातील 13 जिल्ह्यांमधून शनिवार आणि रविवार लॉकडाऊन हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु या जिल्ह्यांतही रात्रीची कर्फ्यू पूर्वीप्रमाणे रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

दरम्यान, देशात काल 18 ते 44 वर्षे वयोगटातल्या  21 लाख 80 हजार नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशभरातल्या 28 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये आतापर्यंत या वयोगटातल्या 9 कोटी 38 लाख जणांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

तर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत 32 कोटी  92 लाखांहून अधिक लस उपलब्ध करुन दिल्या असल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे. येत्या दोन दिवसात आणखी 94 लाख 66 हजारांहून अधिक लसी उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.