मुंबई: आता बातमी पालकांना सावध करणारी आहे. ऑनलाईन शाळेच्या आडून मुलं पॉर्नच्या आहारी जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलं आहे. ऑनलाईन क्लास हा पॉर्नचा फास ठरणार नाही, याची काळजी पालकांनी घ्यायलाच हवी.
सध्या सगळ्याच शाळा ऑनलाईन होत असल्यामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांना स्मार्टफोन किंवा टॅब घेऊन दिले आहेत. शाळा झाल्यानंतरही फोन मुलांकडेच असतात. त्यातूनच ते पॉर्नच्या मायाजालात अडकत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. स्मार्टफोन वापरत असताना फेसबुक, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियाकडे मुलं वळतात.
आपले फोटो, व्हिडिओ शेअर करून त्यावर लाईक्स-कॉमेंट मिळवायचा छंद लागतो. अनेकदा फेसबुक किंवा इन्स्टावर अश्लील वेबसाईट्सच्या लिंक पॉप अप होतात. उत्सुकतेपोटी मुलं या लिंक उघडून बघतात आणि मग त्यांना पॉर्न सर्फिंगचं व्यसनच लागतं.
या मुलांवर लक्ष देणारं कुणी नसेल, तर हे प्रमाण वाढत जातं आणि मग त्याचे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. हे टाळायचं असेल, तर मुलं काय शिकत आहेत. मोबाईलवर काय पाहतायत याची माहिती ठेवायला हवी. त्यासाठी मुलांसोबत संवाद वाढवला पाहिजे. शिवाय सेफ सर्च, पॅरेंटल लॉक, अॅप लॉक, पॉपअप ब्लॉक यासारख्या तंत्रांचा वापर करून अनावश्यक साईट्स रोखता येतील.
मुलं जिज्ञासेपोटी पॉर्नकडे वळतात. त्यामुळे मुलांनी काही अवघड प्रश्न विचारले तरी झिडकारून न लावता त्यांचं योग्य समाधान केलं पाहिजे. असा संवाद आणि तंत्रज्ञान याचा योग्य समतोल राखून पॉर्नच्या जाळ्यातून मुलांची सुटका करता येईल.