नवी दिल्ली : देशभरात लॉकडाऊन दोन आठवडे वाढवण्यात आले आहे. 'लॉकडाऊन २' हा ३ मे पर्यंत वाढण्यात आला होता. पण आता तिसरा लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. असे असले तरीही ऑरेंज आणि ग्रीन झोनला काही मुभा देण्यात आल्या आहेत.
रेड झोनमध्ये कंटेन्मेंट झोन व्यतिरिक्त सर्व दुकाने खुली राहणार आहेत. सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ही दुकाने खुली राहतील. मॉल उघडण्यास परवानगी नाही.
ऑरेंज झोनमध्ये टॅक्सी ड्रायव्हरसोबत एका प्रवाशाला परवानगी देण्यात आली आहे. ६५ वर्षाच्या वरील व्यक्तींना घराबाहेर पडण्यास परवानगी आहे. १० वर्षाखालील व्यक्तींना घराबाहेर पडण्यास सध्या परवानगी नाही.
गर्भवती महिलांना घराबाहेर जाण्यास परवानगी नाही. रेड झोनमध्ये ऑटो, टॅक्सी, रिक्षा आणि बसवर बंदी असेल.
पंतप्रधान मोदींनी आज मंत्र्यांसोबत एक बैठक घेतली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. ४० दिवसांचे लॉकडाऊन ३ मेला संपणार होते. आता तिसरे लॉकडाऊन १७ मे पर्यंत सुरु राहील.
आरोग्य मंत्रालयाने देशाला ३ झोनमध्ये विभागले आहे. ग्रीन झोनमध्ये ३१९ आणि ऑरेंज झोनमध्ये २८४ जिल्हे आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता, अहमदाबाद सहित १३० जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनमध्ये सशर्त मुभा मिळेल. पण रेड झोनमध्ये कोणतीही सवलत नाही.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार राज्य सरकारनेही नियमावली बनवली असून अडकलेल्या लोकांसाठी परराज्यात तसेच राज्यात प्रवास करण्यासाठी रेल्वे आणि बस सोडण्यात येणार आहेत. मात्र परराज्यात जाऊ इच्छिणाऱ्या लोकांनी ग्रुप लिडरच्या माध्यमातून जवळच्या पोलीस ठाण्यात अर्ज करायचे आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. राज्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठीही प्रवासाची परवानगी दिली जाणार असून महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी परवानगी देत नाहीत, तोपर्यंत कुणीही प्रवास करू शकणार नाही.
बसने जायचे असल्यास २५ जणांना आणि ट्रेनने जायचे असल्यास १ हजार जणांना पाठवले जाणार आहे. त्यासाठी ग्रुप लिडरच्या माध्यमातूनच अर्ज करून परवानगी घ्यावी लागणार आहे. परराज्यात जाण्यापूर्वी कोरोनाची लक्षणे नसल्याचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक असेल.
कंटेनमेंट झोनमधील व्यक्तींना मात्र कुठेही बाहेर जाता येणार नाही. संबंधित राज्याची एनओसी मिळाल्यानंतरच त्यांना सोडण्यात येईल.
जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी ठरवलेल्या कंटेनमेंट झोनमध्ये कोणत्याही प्रकारची वाहतूक होणार नाही. या झोनमध्ये कोणी आत येणार नाही, तसेच कुणी बाहेरही जाणार नाही.