मुंबई : गेल्या काही आठवड्यापासून शेअर बाजारात जबरदस्त तेजी दिसून आली आहे. मार्केटमधील तेजीची घौडदौड अद्यापही कायम असून आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने विक्रमी अंकांची नोद केली आहे. जागतिक गुंतवणूकदारांच्या वाढत्या गुंतवणुकीचा परिणाम, अमेरिकी फेडचा बॉंड संदर्भातील निर्णय, कोरोनाचा कमी झालेला संसर्ग, आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूती इत्यादी फॅक्टर बाजाराच्या तेजीला कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
शेअर बाजाराच्या विक्रमी घोडदौडीत गुरूवारी BSE सेन्सेक्स 60 हजाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला होता. गेल्या काही दिवसात शेअर बाजाराची चाल बघता आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ही पातळी ओलांडण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. आज मार्केट सुरू होता 60 हजाराचा आकडा पार झाला आणि गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.
BSE सोबतच NSEच्या निफ्टीनेही 17900 अंकाची कॅप ब्रेक केली आहे. मार्केट सुरू होताच निफ्टीने 18200 अंकांची ऐतिहासिक उसळी घेतली होती.
आजच्या टॉप गेनर्स कंपन्यांमध्ये इंफोसिस, HCLTECH, TECHM, HDFCBANK, TCS, ASIANPAINT, INDUSINDBK, LT आणि ICICIBANK च्या शेअर्सचा सामावेश आहे.
सेन्सेक्सनं 50 हजाराचा टप्पा 22 जानेवारीला ओलांडाला होता तर अवघ्या 272 दिवसात 10 हजार अंकांची उसळी नोंदवली गेली आहे.
चीनमधील एक मोठी रिअल इस्टेट कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानं तेथील जागतिक गुंतवणूकदार तिथल्या शेअर बाजारातून पैसे काढून भारत आणि अन्य शेअर बाजारांकडे पैसे फिरवू लागले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून निफ्टी आणि सेन्सेक्स दररोज नवे उच्चांक नोदंवत आहेत.
शिवाय देशातली कोरोनाची सुधारणारी परिस्थिती, सातत्यानं वाढणारं लसीकरण आणि पूर्वपदावर येणारी अर्थव्यवस्था यामुळे बाजारातील तेजीला आणखी बळ मिळतंय.