'फॅनी'ची ओडिशा तटाला जोरदार धडक, २०० किलोमीटर प्रतितास वेगानं वाहतेय हवा

ओडिशातील गंजम, गजपती, खुर्दा, पुरी, जगतसिंगपूर, केंद्रपाडा, भद्रक आणि बालासोर या जिल्ह्यांना वादळाचा सर्वाधिक धोका आहे

Updated: May 3, 2019, 10:49 AM IST
'फॅनी'ची ओडिशा तटाला जोरदार धडक, २०० किलोमीटर प्रतितास वेगानं वाहतेय हवा  title=

भुवनेश्वर : अक्राळविक्राळ रुप धारण करणारं 'फॅनी' चक्रीवादळ शुक्रवारी सकाळी ९.०० वाजल्याच्या सुमारास ओडिशा समुद्र किनाऱ्यावर येऊन धडकलंय. फॅनीमुळे जोरदार हवा वाहतेय... पाऊस कोसळतोय... पुरी आणि आसपासच्या भागात हवेचा वेग सुमारे २०० किलोमीटर प्रति तास आहे. राज्य सरकानं अगोदरच ओडिशातील ११ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवलंय. या भागांत न जाण्याचं आवाहन पर्यटकांना करण्यात आलंय. सर्व शाळा आणि कॉलेजलाही आज सुट्टी देण्यात आलीय.  

सकाळी ८.०० वाजता

'फॅनी' वादळ अवघ्या २ तासांत ओडिशा किनारपट्टीवर धडकणार आहे. वादळ अवघ्या ६० किलोमीटर अंतरावर पोहचलं असून वादळाआधी मुसळधार पावसाला सुरूवात झालीय. तब्बल १० हजार नागरिकांचा बळी घेणारं चक्रीवादळ १९९९ साली ओडिशाला धडकलं होतं. त्यानंतरचं फॅनी हे दुसरं भीषण वादळ ओडिशाच्या दिशेनं निघालंय..वादळाच्या तडाख्यात मालमत्तेचं मोठं नुकसान होणार, हे उघड आहे...

हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ५.३० वाजता फॅनी जगन्नाथ पुरीपासून ८० किलोमीटर तर गोपाळपूरपासून केवळ ६५ किलोमीटर दूर होतं. जवळपास ४० किलोमीटर प्रतितास वेगानं फॅनी वळणं घेत समुद्रकिनाऱ्यावर धडकणार आहे. सकाळी ८ ते १० वाजल्याच्या सुमारास हे वादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. समुद्र तटावर या वादळाचा वेग जवळपास १८० ते १९५ किलोमीटर प्रतितास तर हवेचा वेग २०५ किलोमीटर प्रती वेगानं असेल. 

ओडिशातील समुद्र किनाऱ्यालगत असलेली १० हजार गावं आणि ५२ शहरांना फॅनी चक्रीवादळाचा जबर तडाखा बसण्याची भीती आहे. वादळाचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. हे वादळ ओडिशात पुरीच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. धडकेल, अशी माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे.

फॅनी वादळाचा धोका पाहता ओडिशाच्या किनाऱ्यावरून तब्बल ११.५ लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येतंय. यापैंकी ३.३ लाख नागरिकांना आधीच सुरक्षित ठिकाणी पोहोचवलंय. फॅनी वादळाचा सामना करण्यासाठी ओडिशा सरकारने पूर्ण तयारी केली आहे. नागरिकांना ९०० शिबिरांमध्ये हलवण्यात आलं आहे.

ओडिशातील गंजम, गजपती, खुर्दा, पुरी, जगतसिंगपूर, केंद्रपाडा, भद्रक आणि बालासोर या जिल्ह्यांना वादळाचा सर्वाधिक धोका आहे.  तर पश्चिम बंगालमधील पश्चिम आणि दक्षिण मिदनापूर, उत्तर २४ परगना, हावडा, हुगली, झारग्राम आणि कोलकाता बाहेरील भागाला वादळाचा धोका आहे. आंध्र प्रदेशात श्रीकाकुलम, विजयनगर आणि विशाखापट्टणम या शहरांना वादळाचा धोका आहे. 

 सुरक्षेच्या कारणात्सव भुवनेश्वरचं बीजू पटनायक आंततराष्ट्रीय विमानतळ  २४ तासांसाठी बंद असेल... अडकून पडलेल्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याची काळजी घेण्यात येतेय... वादळ आणि त्यासोबत येणाऱ्या पावसामुळे रेल्वेनं गेल्या दोन दिवसांत ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमधून धावणाऱ्या तब्बल १०३ लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्यात.