लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (UP Election 2022) पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या 10 फेब्रुवारी रोजी होत आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाने सर्व दारू दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषत: गाझियाबाद आणि नोएडाशी जोडलेल्या दिल्ली बॉर्डरवरील (दिल्ली) सर्व दारूची दुकाने बंद राहतील. सीमेपासून 100 मीटरच्या आत असलेली सर्व दुकाने या आदेशाच्या कक्षेत असतील.
दारुच्या दुकानांना कुलूप
मंगळवारी संध्याकाळी दारूची दुकाने बंद होती जी आज आणि उद्या म्हणजे बुधवार आणि गुरुवारपर्यंत बंद राहणार आहेत. म्हणजेच या दारू दुकानांना कुलूप लटकलेले आढळणार आहे. दिल्लीच्या उत्पादन शुल्क आयुक्तांनी नोटीस बजावून याबाबत माहिती दिली आहे. नोटीसनुसार 8 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजल्यापासून 10 फेब्रुवारीला मतदान संपेपर्यंत मद्यविक्रीवर पूर्ण बंदी असेल.
हा आदेश उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व परवानाधारकांना लागू असेल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. दिल्ली-यूपी सीमेच्या 100 मीटरच्या आत आलेली सर्व दुकाने किंवा बार, तिथे पोहोचलेले लोक रिकाम्या हाताने परतत आहेत. यूपी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानात गौतम बुद्ध नगर आणि गाझियाबादचाही समावेश आहे.
सरकारी आदेशानुसार, 10 मार्चला यूपीमध्ये मतमोजणीचा दिवसही ड्राय डे असेल. 10 मार्च रोजी देखील या कक्षेत येणारे सर्व दारूचे ठेके पूर्णपणे बंद राहतील.