पॅनकार्डधारकांनो, ही बातमी वाचाच, नाहीतर....

पॅनकार्ड एकदा रद्द झाले की ते पुन्हा सक्रीय करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.

Updated: Dec 17, 2018, 09:59 AM IST
पॅनकार्डधारकांनो, ही बातमी वाचाच, नाहीतर.... title=

मुंबई - पॅनकार्ड सध्याच्या काळात अत्यंत आवश्यक झाले आहे. कोणताही मोठा व्यवहार करताना तुम्हाला पॅनकार्ड मागितले जाते. पण केवळ पॅनकार्ड काढून उपयोग नाही. तर आता पॅनकार्ड आधारकार्डला लिंक करणेही तितकेच आवश्यक आहे. गेल्या वर्षापासून सातत्याने यासाठीची डेडलाईन केंद्र सरकारकडून वाढविण्यात येत आहे. आता ही डेडलाईन ३१ मार्च २०१९ आहे. त्यापूर्वी तुम्ही तुमचे पॅनकार्ड आधारकार्डला लिंक केले नाही. तर तुमचे पॅनकार्डच रद्द होऊ शकते. पॅनकार्ड एकदा रद्द झाले की ते पुन्हा सक्रीय करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे ते टाळण्यासाठी पॅनकार्ड आधारकार्डला लिंक करणे आवश्यक आहे.

जर पॅनकार्ड आधारकार्डला लिंक केले नाही. तर प्राप्तिकरदाते आपले रिटर्न ऑनलाईन भरू शकणार नाहीत. त्याचबरोबर जर तुम्ही रिटर्नमध्ये करपरताव्याची मागणी केली असेल, तर ते सुद्धा पॅनकार्ड आधारला लिंक केल्याशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणजेच तुम्हाला तुमचा करपरतावा मिळण्यासाठी वाट पाहावी लागेल. त्याचबरोबर तुमचे पॅनकार्डही रद्द केले जाऊ शकते. त्यामुळे हे टाळण्यासाठी पॅनकार्ड आधारला लिंक करणे गरजेचे आहे. पॅनकार्ड आधारला लिंक करण्याची मुदत ३० जून २०१८ होती, ती आता वाढवून ३१ मार्च २०१९ करण्यात आली आहे. 

लिंक करण्यासाठी..
पॅनकार्ड आधारला लिंक करण्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या www.incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर जा. इथे तुम्हाला क्वीक लिंक्समध्ये दुसऱ्याच क्रमांकावर 'Link Aadhaar'असे दिसेल. त्यावर क्लिक करा. जर या वेबसाईटवर तुमचे अकाऊंट नसेल, तर आधी नोंदणी करावी लागेल. लॉग इन केल्यावर लगेचच एक पान उघडेल. प्रोफाईल सेटिंगमध्ये आधार कार्ड लिंक करण्याचा पर्याय तुम्हाला दिसेल. त्याला निवडा. तिथे दिल्या गेलेल्या सेक्शनमध्ये आपला आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड लिहा. त्यानंतर खाली दिलेल्या लिंक आधार पर्यायावर क्लिक करा.

मोबाईलवरूनही करू शकता लिंक
मोबाईलच्या साह्यानेही तुम्ही पॅनकार्ड आधारला लिंक करू शकता. SMS आधारित सेवेच्या माध्यमातून तुम्ही पॅनकार्ड आधारला लिंक करू शकता. यासाठी मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन टाईप करा UIDPAN<12 अंकांचा आधार क्रमांक ><10 अंकाचा पॅन नंबर >त्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून हा मेसेज 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवून द्या.