कडाक्याच्या थंडीमुळे स्पिती व्हॅलीतील 'या' नद्या गोठल्या

रस्त्यांवरील वाहतुकीवरही याचे परिणाम 

ANI | Updated: Oct 7, 2018, 12:15 PM IST
कडाक्याच्या थंडीमुळे स्पिती व्हॅलीतील 'या' नद्या गोठल्या title=

मुंबई: हिमाचल प्रदेशमध्ये पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या लाहौल स्पिती व्हॅलीमध्ये आता तापमानाने नीचांक गाठल्याचं पाहायला मिळत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या ट्विटर अकाऊंटवरुन स्पिती व्हॅलीतील काही फोटो पोस्ट करण्यात आले असून, त्यात सर्वत्र बर्फाची चादर पसरल्याचं पाहायला मिळत आहे. 

हिमाचल प्रदेशमधील अतिशय उंचीवर असणाऱ्या भागांमध्ये असणाऱ्या नद्या आणि तलाव गोठले असून तापमानाने नीचांक गाठल्याचं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

चंद्रा नदीचं पात्रही गोठलं असल्यामुळे सध्या बातल, छत्रू आणि त्या परिसरात चंद्रताल पाहण्यासाठी जाणारे रस्तेही बंद करण्यात आल्याचं कळत आहे. 

सध्याच्या घडीला पर्यटकांनाही स्पिती व्हॅलीच्या पुढच्या प्रवासाला न जाण्याचा इशारा देण्यात आला असून, छोटा दरा आणि छत्रू या भागांमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. 

सदर परिसरात बर्फवृष्टीलाही सुरुवात झाल्यामुळे रस्त्यांवरील वाहतुकीवरही याचे परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.