VIDEO : मंगळसूत्र-टिकलीसहीत नुसरत जहाँ ममता बॅनर्जींसोबत रथयात्रेत सहभागी

साडी, मंगळसूत्र, हातात लाल रंगाच्या बांगड्या, कपाळावर टिकली अशा अशा पारंपरिक हिंदू पेहरावात नवविवाहीत खासदार नुसरत जहाँ यांनी इतर उपस्थितांसोबत रथयात्रेत सहभाग घेतला

Updated: Jul 4, 2019, 08:22 PM IST
VIDEO : मंगळसूत्र-टिकलीसहीत नुसरत जहाँ ममता बॅनर्जींसोबत रथयात्रेत सहभागी title=

कोलकाता : बसीरहाट मतदार संघातून निवडून आलेल्या टीएमसीच्या नवनिर्वाचित खासदार नुसरत जहाँ आपल्या खासगी आणि सार्वजनिक जीवनामुळे चर्चेत आहेत. आंतरधर्मीय विवाहानंतर त्या कट्टरपंथियांच्या निशाण्यावर आहेत. गुरुवारी नुसरत जहाँ पती निखिल जैन यांच्यासोबत इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्ण कॉन्सियसनेस (इस्कॉन)च्या रथयात्रेत सहभागी झाल्या. दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीच केलं. यंदाच्या कार्यक्रमात नुसरत यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. 

साडी, मंगळसूत्र, हातात लाल रंगाच्या बांगड्या, कपाळावर टिकली अशा अशा पारंपरिक हिंदू पेहरावात नवविवाहीत खासदार नुसरत जहाँ यांनी इतर उपस्थितांसोबत रथयात्रेत सहभाग घेतला. 'इस्कॉनद्वारे मला आमंत्रित करण्यात आलं, मी सौभाग्यशाली आहे. या कार्यक्रमाचा एक भाग बनताना मला आनंद होत आहे. पश्चिम बंगाल सर्वच कोणत्याही सांप्रदायिक भेदभावाशिवाय धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात' असं त्यांनी यावेळी म्हटलं. 

'सर्व धर्मांप्रती सहिष्णुता आणि एकजुटता हाच खरा धर्म आहे' असं यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं. राज्याच्या राजधानीत इस्कॉनचा हा ४८ वा रथोत्सव आहे. यावेळी, जय जगन्नाथ, जय हिंद आणि जय बांग्लाच्या घोषणा करण्यात आल्या.   

शपथविधीसाठी संसदेत असाच पेहराव करून आलेल्या नुसरत जहाँ या कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी आपण सर्व धर्मांचा आदर करत असून अजूनही मुस्लीम असल्याचं स्पष्ट केलं होतं.

गुरुवारी एका नामांकीत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नुसरत जहाँ आणि निखिल जैन आपल्या लग्नाचं रिसेप्शन देणार आहेत.