Kolkata Doctor Rape Murder Case : कोलकातामधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांसोबत जे प्रकार घडलं, एवढी क्रूरता क्वचितच कोणत्या घटनेत झाली असेल. बेदम मारहाण, नंतर बलात्कार आणि शेवटी खून… या क्रूरतेने सर्वांनाच हादरून सोडलंय. कोलकातामधील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी धक्कादायक खुलासे होत आहेत. या महिला डॉक्टरांसोबत झालेल्या क्रूरतेने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.
शवविच्छेदन अहवालात नराधमाने तिला खूप मारहाण केल्याचं समोर आलंय. यामध्ये पीडितेचा चष्मा चकनाचूर झाला असून काचेचे तुकडे तिच्या डोळ्यात घुसले होते. पीडितेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टने सर्वांनाच धक्का बसलाय. शवविच्छेदन अहवालात असं समोर आलंय की, या नराधमाने 31 वर्षीय पीजी विद्यार्थिनी डॉक्टरवरच फक्त बलात्कार केला नव्हता तर अमानुषपणे मारहाण केली होती. तिच्या शरीराच्या प्रत्येक भागावर जखमांच्या खुणा होत्या.
शवविच्छेदन अहवालानुसार पीडितेच्या हातावर आणि चेहऱ्यावर चाव्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. एवढंच नाही तर आरोपीने पीडितेचे डोके भिंतीवर आपटले होते, त्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
प्रशिक्षणार्थी डॉक्टर जिवंत असतानाच तिच्यावर हल्ला झाल्याचं पोस्टमॉर्टम अहवालातून समोर आलंय. तिच्या प्रायव्हेट पार्टवर झालेल्या जखमांवरून तिच्यावर बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालंय. नराधमाने अमानुष मारहाण करून लैंगिक अत्याचार केल्यानंतर प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा गळा दाबून हत्या केली. अहवालात मृत्यूची वेळ ही शुक्रवारी पहाटे 3 ते 5 या दरम्यान नोंदविण्यात आलीय.
या प्रकरणात कोलकाता पोलिसांनी संजय रॉय नावाच्या आरोपीला अटक केलीय. आरोपी हा कोलकाता पोलिसात काम करणारा नागरी स्वयंसेवक असून त्याला 12 हजार रुपये पगार मिळायचा. पोलीस असल्याच सांगून तो सर्व चुकीचे काम करायचा.
मीडिया रिपोर्टनुसार, आरोपी संजय रॉय दारूच्या नशेत असताना पोलिसांनी त्याला पकडलं. आरोपीच्या हातावर आणि चेहऱ्यावर चाव्याच्या खुणाही आढळून आल्या आहेत, यावरून पीडितेने स्वत:ला वाचवण्यासाठी विरोध केल्याचे दिसून येते. त्याचवेळी अधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, पुरावे मिटवण्यासाठी त्याने घातलेले कपडे धुतले होते. झडती घेतली असता, त्याचे बूट सापडले ज्यावर रक्ताचे डाग होते.
मीडिया रिपोर्टनुसार, प्रशिक्षणार्थी डॉक्टरने रात्री अडीच वाजता चार सहकाऱ्यांसह पॅरिस ऑलिम्पिकची नीरज चोपडाची भालाफेकचा सामना पाहिला होता. त्यानंतर आराम करण्यासाठी ती सेमिनार हॉलमध्ये गेली. पोलिसांनी सात ज्युनियर डॉक्टरांचं जबाब नोंदवले आहेत. ज्यात त्यांनी चार जणांनी तिच्यासोबत जेवण केल्याच सांगितलं. त्यासोबत मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला की, त्या महिलेने रात्री 11 वाजता आईला फोन केल्यानंतर ऑनलाइन जेवण ऑर्डर केलं होतं. रात्री जेवण झाल्यानंतर महिला डॉक्टर सेमिनार हॉलमध्ये लाल ब्लँकेट अंगावर घेऊन निळ्या रंगाच्या कार्पेटवर झोपली होती. त्यावेली नराधमाने तिच्यावर हल्ला केला.
दरम्यान, मृत महिला डॉक्टरच्या पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतलीय. त्यांनी याचिका दाखल करून आपली व्यथा मांडलीय. त्यांचा तपासावर पूर्ण विश्वास नसल्याचे सांगत त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केलीय. सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने मृत डॉक्टरच्या पालकांच्या याचिकेला परवानगी दिली. पीडितेच्या पालकांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत आरोप केला आहे की, 'सकाळी साडेनऊ वाजता त्यांना त्यांची मुलगी आजारी असल्याचा फोन आला. यानंतर 15 मिनिटांनी त्यांनी फोन केला आणि त्यांच्या मुलीने आत्महत्या केलीय. त्यामुळे तपासावर पूर्ण विश्वास नाही असं आई वडिलांनी सांगितलं असून मुलीला न्याय हवा आहे.'
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पोलिसांना रविवारपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान राज्य पोलिसांनी एसआयटी स्थापन केली आहे. रविवारपर्यंत या प्रकरणावर ठोस पुरावे उभे केले नाहीत तर हे प्रकरण सीबीआयकडे प्रकरण सोपवणार येणार आहे. दरम्यान भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केलीय. त्या याचिकेत त्यांनी या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केलीय.