केरळ वादळाचा कोकण किनारपट्टीला फटका

सलग पाच दिवस मच्छिमारी ठप्प झाली असून १० ते १२ कोटी रुपयांचा फटका बसलाय.

Updated: Aug 20, 2018, 05:31 PM IST
केरळ वादळाचा कोकण किनारपट्टीला फटका  title=

केरळ : केरळमधील वादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर झालाय. सलग पाच दिवस मच्छिमारी ठप्प झाली असून १० ते १२ कोटी रुपयांचा फटका बसलाय. सुरुवातीपासूनच मच्छिमारी हंगामावरील वादळाचं सावट कायम राहिलंय. वेगवाग वाऱ्यामुळे समुद्र खवळला असून आणखी चार दिवस असंच वातावरण कायम राहिल असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

उत्पादनासाठी स्पर्धा 

हंगाम सुरु झाल्यानंतर पहिले तीन दिवस कोळंबी, पापलेट आणि बांगडा मिळत होता. मात्र त्यानंतर लगेचच वातावरण बदललं. अनेक नौका बंदरात परतल्या. सरकारी आदेशानुसार १ ऑगस्टला बंदी उठल्यावर मच्छीमार किनाऱ्यापासून जवळच मासेमारी करतात. भविष्यात मासळी पाण्याच्या प्रवाहांबरोबर पुढे सरकते. ऑगस्ट, सप्टेंबर या दोन महिन्यात जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी स्पर्धा असते. याच काळात पाऊस, वादळाचा सामनाही करावा लागतो.

पाण्याला करंट

वादळामुळे अनेकवेळा मासेमारी बंद ठेवावी लागते. मिरकरवाडा, हर्णै या बंदरात कोट्यावधीची उलाढाल होते. मात्र गेल्या पाच दिवसात वातावरण खराब राहिल्याने उलाढाल थांबलीय. पाण्याला करंट असल्यामुळे मच्छीमारांनी किनाऱ्यावरच राहणं पसंत केलंय.