मुंबई : केरळच्या शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बरीच गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली होती. त्यातच मंदिर भक्तांसाठी खुलं झाल्यामुळे दर्शनाला येणाऱ्यांची गर्दी आणि आंदोलकांचा महिलांच्या प्रवेशाला होणारा विरोध या सर्व गोष्टी हाताळताना केरळच्या पोलीस यंत्रणांच्या नाकी नऊ आले आहेत.
मंदिर परिसरात होणाची श्रद्धाळूंची गर्दी आणि हे एकंदर वातावरण पाहता केरळ पोलीसांनी मंगळवारी 'डिजिटाईज्ड क्राऊड मॅनेजमेंट सिस्टीम'ची सुरुवात करणार असल्याचं जाहीर केलं.
यंदाच्याच वर्षी ही यंत्रणा लागू होणार आहे. या सेवेअंतर्गत श्रद्धाळू शबरीमला मंदिराला भेट देण्यासाठीची तारीख आणि वेळ निवडू शकणार आहेत.
sabarimala.com या संकेतस्थळावर त्यांना वेळ आणि तारीख आरक्षित करता येणार आहे. दर्शनासाठीची वेळ ठरवण्यासोबतच निलक्कल ते पंबापर्यंतच्या बस प्रवासासाठीच्या तिकिटांचं आरक्षणही याच संकेतस्थळांवरुन करता येणार आहे. तिकिट आरक्षित केल्यानंतर ते पुढच्या ४८ तासांसाठी वैध असणार आहे.
दरम्यान, पोलीस यंत्रणांकडून विचारात असणाऱ्या या यंत्रणेमुळे येत्या काळात शबरीमला मंदिर परिसरात होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थापनात काही हातभार लागणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सर्व वयोगटातील महिलांना या पुरातन मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी असल्याचा निर्णय दिल्यानंतर अनेक स्तरांतून या निर्णयाचा विरोध झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
The Kerala Police announced the implementation of a Digitalised Crowd Management System to make the visit of devotees to the iconic Sabarimala Temple hassle-free
Read @ANI story | https://t.co/rJwbbUW8yE pic.twitter.com/m4rww3iN14
— ANI Digital (@ani_digital) October 30, 2018
आतापर्यंत विरोध करणाऱ्या ३५०५ आंदोलकांना पोलिसांनी केरळ राज्यात हिंसा भडकावल्याप्रकरणी ताब्यात घेतलं होतं. सदर प्रकरणी आकापर्यंत एकूण ५२९ गुन्हे संपूर्ण राज्यात दाखल करण्यात आल्याचं वृत्त 'एएनआय'ने प्रसिद्ध केलं आहे.