नवी दिल्ली : कामावरुन घरी पोहोचण्याची घाई प्रत्येकालाच असते. त्यासाठी कुणी शॉर्टकर्ट रस्ता वापरतं तर कुणी खासगी गाडी घेऊन घर गाठतं. पण केरळमध्ये एक विचित्रच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
केरळमधील कोल्लम येथील एका व्यक्तीला घरी पोहोचण्यासाठी उशीर होत होता. त्यामुळे त्याने चक्क केएसआरटीसीची बसच चोरी केली. २५ वर्षांच्या या तरुणाने दारुच्या नशेत हे कृत्य केलं आहे.
अलॉयजियस नावाचा हा व्यक्ती आपल्या मित्राला भेटण्यासाठी कोल्लम येथे गेला होता. त्यानंतर तो तिरुअनंतपुरम मधील अट्टिंगल इथल्या आपल्या घरी परतत होता. मात्र, त्याची बस निघून गेली. यानंतर त्याने चक्क बस स्थानकातील बसचं चोरी केली.
बस स्थानकात अनेक बसेस उभ्या होत्या. त्या बसेसला चाव्याही होत्या. त्यापैकी एक बस अलॉयजियसने सुरु केली आणि आपल्या घराकडे निघाला. दारुच्या नशेमध्ये त्याने काही अंतर पारही केलं. पण नंतर त्याने बस वीजेच्या खांबाला धडकली.
बसला अपघात झाल्याने तो बस त्याच ठिकाणी सोडून निघून गेला. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी चौकशी सुरु केली. पण, अलॉयजियसची चप्पल बसमध्येच राहील्याने तो पुन्हा बसजवळ आला. त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली.