काश्मिरी अधिकारी शाह फैजल राजकारणात, नवा पक्ष जम्मू काश्मीर सिटीजन पार्टी

जम्मू-काश्मीरमधल्या घडामोडी सध्या देशातल्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.  काश्मिरी तरुण शाह फैजल यांनी जम्मू कश्मीर सिटीजन पार्टी या नव्या पक्षाची स्थापना केली आहे.  

Updated: Mar 7, 2019, 11:45 PM IST
काश्मिरी अधिकारी शाह फैजल राजकारणात, नवा पक्ष जम्मू काश्मीर सिटीजन पार्टी title=

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधल्या घडामोडी सध्या देशातल्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तान आणि काश्मीरमध्ये सुरू केलेली कारवाई हा निवडणुकीचा मुद्दा बनला आहे. जम्मू-काश्मीरच्या राजकारणाच्या पटावर आता एक नवे प्यादे येत आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सुवर्णपदक पटकावणारे काश्मिरी तरुण शाह फैजल यांनी जम्मू कश्मीर सिटीजन पार्टी या नव्या पक्षाची स्थापना केली आहे. प्रशासकीय सेवेतून राजीनामा देऊन त्यांना राजकारणात उतरावेसे का वाटले? काश्मीर समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याकडे काही ठोस योजना आहे का? याचीच चर्चा होत आहे.

यूपीएससी परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावणारे पहिले काश्मिरी ठरलेले २००९च्या तुकडीतील आयएएस अधिकारी शाह फैजल यांनी बुधवारी सेवेचा राजीनामा दिला होता. त्यांनी आपल्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. काश्मीरमध्ये सातत्याने होत असलेल्या हत्या आणि भारतीय मुस्लिमांना दिली जात असलेली दुय्यम वागणूक याच्या निषेधार्थ राजीनामा देत असल्याचे ३५ वर्षीय फैजल यांनी सांगितले होते. मात्र, त्यांनी आता राजकारणात सक्रीय होण्याचे ठरविले आहे. त्यांनी आपल्या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली.

काश्मीरमध्ये सातत्याने होणाऱ्या हत्या, त्या रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अपुरे प्रयत्न होत आहेत. हिंदूत्ववादी गटांकडून २० कोटी भारतीय मुस्लिमांना दुय्यम वागणूक मिळत आहे. अति-राष्ट्रवादाच्या नावाखाली जम्मू-काश्मीर राज्यात पसरवली जाणारी असहिष्णुता आणि वैरभाव या विरोधात कार्य करण्यासाठी मी राजीनामा देत आहे, असे फैजल यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे. 

दरम्यान, ते राजकारणात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. फैजल हे नॅशनल कॉन्फरन्सकडून बारामुल्ला मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात होते. ‘प्रशासकीय सेवेने जे गमावले, ती राजकारणाची कमाई ठरेल,’ असे ट्विट पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केले. हे विधान फैजल यांच्या राजकारण प्रवेशाचे सूचक मानले जात आहे. मात्र, या सर्वांचा अंदाज चूकवत त्यांनी स्वतंत्र राजकीय पक्षाची स्थापना केली. त्यामुळे राजकारणात जाणार अशी चर्चा होती, ती त्यांनी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन खरी ठरवली.