कर्नाटकात गुरुवारी बहुमताची परीक्षा; कुमारस्वामींची लागणार कसोटी

गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

Updated: Jul 15, 2019, 05:47 PM IST
कर्नाटकात गुरुवारी बहुमताची परीक्षा; कुमारस्वामींची लागणार कसोटी  title=

दीपक भातुसे, झी मीडिया, बंगळुरू : गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. येत्या गुरूवारी १८ जुलै रोजी मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारविरोधात विधानसभेत अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. यानंतर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. 

 कसं असेल कर्नाटकातील शक्तिप्रदर्शन
- गुरुवारी कर्नाटक सरकारची विधानसभेत शक्ती परीक्षा होणार आहे.

- विधानसभा अध्यक्ष विश्वासदर्शक ठरावावर विधानसभेत मतदान घेतील.

- हे मतदान कसे असेल याबाबत उत्सुकता.

- मतदान कसे असेल याबाबत निर्णय घेण्याचा सर्वाधिकार विधानसभा अध्यक्षांचा असेल.

- विधानसभा अध्यक्ष सभागृहात आवाजी मतदानाने किंवा प्रत्यक्ष डोकी मोजून मतदान घेऊ शकतात.

- प्रत्यक्ष डोकी मोजून मतदान झाले तर सरकारसाठी धोक्याची घंटा असू शकते.

- प्रत्यक्ष डोकी मोजण्याचा निर्णय घेतला तर विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने असलेल्या आमदारांना उभे राहून क्रमाने आकडे बोलत मतदान पूर्ण करावे लागणार, त्यानंतर विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधातील आमदार आकडे बोलत मतदान पूर्ण करणार.

- त्यानंतर अध्यक्ष निकाल जाहीर करतील. 

- विधानसभा अध्यक्षांनी आवाजी मतदानाने मतदान घेतले, तर मात्र सरकारच्या बाजूने कौल येण्याची शक्यता आहे.
 
- अध्यक्ष विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मतास टाकतील, विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने असलेल्यांनी होय म्हणायचे विरोधात असलेल्यांनी नाही म्हणायचे.

- यावेळी प्रत्यक्ष किती जण होय आणि किती जण नाही बोलले ते मोजले जात नाही, अध्यक्ष अशा वेळी स्वतःला पटेल तो निकाल देऊ शकतात.
 
- मात्र भाजपा आवाजी मतदानाने मतदान मान्य करणार नाही, प्रत्यक्ष डोकी मोजून मतदान घ्यावे असा भाजपाचा आग्रह असणार आहे.