बंगळुरू: काँग्रेस आमदाराचा अजब कारनामा विधानपरिषदेत समोर आला आहे. विधानपरिषदेत प्रश्न उत्तराच्या तासादरम्यान पॉर्न पाहात असल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेमुळे तुफान खळबळ उडाली आहे. तर विरोधीपक्ष भाजपने काँग्रेस आमदाराच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे विधानपरिषदेत मोठी खळबळ उडाली आणि चर्चेला उधाण आलं.
कर्नाटकमधील काँग्रेस आमदार सभागृहात पॉर्न पाहत असल्याचं समोर आलं आहे. काँग्रेस आमदार प्रकाश राठोड विधानपरिषदेत मोबाईल वापरत होते. यावेळी एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकारानं हे दृष्य कॅमेऱ्यात चित्रित केलं आहे. आमदार प्रकाश राठोड हे मोबाईलमध्ये अश्लील फोटोज स्क्रोल करताना दिसले.
हे प्रकरण तापल्यानंतर आता काँग्रेस आमदारानं यावर अजब दावा केला आहे. काँग्रेस आमदार प्रकार राठोड यांनी आपल्या कारनाम्यावर पांघरुण घालत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 'सभागृहात काही मुद्दे मांडण्यासाठी आपण मोबाईल घेऊन गेलो होतो. मोबाईलमधील डेटा फूल झाल्यामुळे डेटा डिलीट करत असल्याचा दावा आमदार प्रकाश राठोड यांनी केला.
दरम्यान याप्रकऱणी भाजपकडून प्रकाश राठोड यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. कर्नाटक विधान भवनातील ही पहिली घटना नाही. यापूर्वीही 2012 मध्ये लक्ष्मण सवदी, सीसी कृष्णा पाटील आणि कृष्णा पालेमार हे सभागृहात कामकाज सुरू असताना अश्लील व्हिडीओ पाहताना कॅमेरात कैद झाले होते. त्यानंतर वादंग माजलं होतं आणि आता प्रकाश राठोड यांच्यामुळे पुन्हा एकदा वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे.