बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांना विधानसभेत आज बहुमताचा सामना करावा लागेल. कर्नाटक विधानसभेत आज मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी हे बहुमत सिद्ध करणार आहेत. दुपारी १२.१५ वाजता पहिल्यांदा विधानसभा सभापती निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभा सभापती निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. त्यानंतर कुमारस्वामी आपले बहुमत सिद्ध करणार आहेत. तथापि, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकण्याचा आत्मविश्वास व्यक्त केलाय. दरम्यान, भाजपने आघाडी सकारविरोधात अडचणी निर्माण करण्यासाठी व्युहरचना केलेय. त्याचाच एक भाग म्हणून विधानसभा अध्यक्ष पद निवडणुकीत आपला उमेदवार उतरवलाय.
दरम्यान विश्वासदर्शक ठरावा आधी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी प्रश्न विचारला गेला. तुम्हाला काही टेन्शन आहे का? आमच्यावर कोणतेही टेन्शन नाही तसेच कोणताही तणाव नाही, आम्ही बहुमतानेच विश्वासदर्शक ठराव जिंकू असा विश्वास कुमारस्वामी यांनी यावेळी व्यक्त केलाय. कुमारस्वामी यांना एएनआयने वृत्तसंस्थेने एक प्रश्न विचारला. त्यावेळी ते म्हणालेत "माझ्यासमोर काही तणाव नाही. बहुमत मिळवून मी विश्वासदर्शक ठराव जिंकणार आहे.'
I have no tension, I am going to win clearly: CM #HDKumaraswamy on today's floor test. #Karnataka pic.twitter.com/b6VgoKniUy
— ANI (@ANI) May 25, 2018
तर दुसरीकडे काँग्रेसच्या पाठिंब्यावर जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी, कर्नाटकच्या राजकीय रंगमंचावरील नाट्यावर अद्याप पडदा पडलेला नाही. काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी पाठिंब्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळं या नाट्याचा पुढचे नाट्य सुरू झाले आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामींना ५ वर्षांच्या कार्यकाळासाठी समर्थन देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं सांगून परमेश्वर यांनी जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारच्या बहुमत चाचणीपूर्वीच राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे कुमारस्वामींच्या उत्तरावर बरच काही अवलंबून आहे.
कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून जनता दल सेक्युलरचे एच. डी. कुमारस्वामी यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष आणि दलित नेते जी. परमेश्वर यांनी यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कर्नाटक विधानसभेच्या प्रांगणात पार पडलेल्या या सोहळ्यात राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. कर्नाटकातला गेल्या आठवड्याभरातला हा दुसरा शपथविधी सोहळा होता. त्याआधी भाजपचे नेते बी.एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, त्यांनी बहुमताची परीक्षा देण्यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
कर्नाटमध्ये एच.डी. कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्याला विरोधक एकवटल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी मोदी विरोधकांनी एका व्यासपीठावर येत हम साथ साथ है असल्याचे दाखवून दिलं. मात्र खरंच या नेत्यांची मनं जुळलीत का यावर मात्र संभ्रम कायम आहे. कारण हातात हात घालून एकी दाखवणाऱ्या विरोधी पक्षांमध्ये सारं काही आलबेल नसल्याचे समोर आलंय. शक्तिप्रदर्शनानंतरही विरोधकांची महाआघाडी बनणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी याबाबत संकेत दिलेत. भाजपला रोखण्यासाठी विरोधकांच्या एकीच्या नावाखाली तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जींशी हात मिळवण्याचा प्रश्नच नाही असा सवाल येचुरी यांनी उपस्थित केलाय.