बंगळुरू: जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांनी शनिवारी संध्याकाळी साडे सात वाजता कर्नाटक राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी कुमारस्वामींना सरकार स्थापनेचं निमंत्रण दिलं. त्यानुसार बुधवारी २३ तारखेला कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर राज्यपालांनी कुमारस्वामींना १५ दिवसांची मुदत बहुमत सिद्ध करण्यासाठी दिली आहे. दरम्यान, काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक आकडा गाठण्यामध्ये जेडीएसला कोणतीही अडचण येणार नाही.
दरम्यान, कुमारस्वामी हे मुख्यमंत्री पदाची शपथ सोमवारी घेणार होते. मात्र, मात्र सोमवारी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी असल्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ बुधवारी म्हणजेच २३ तारखेला घेणार असल्याचे कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले आहे.
तीन दिवस रंगलेल्या राजकीय नाट्यानंतर अखेर कर्नाटकमध्ये बहुमत सिद्ध करण्यात भाजपाला अपयश आलंय. विश्वासदर्शक ठराव मंजूर होणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर बी.एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. काल पाऊणेचारच्या सुमारास येडियुरप्पा विधानसभेत भाषणासाठी उभे राहिले... अत्यंत भावनिक झालेल्या या भाषणात त्यांनी सर्वात मोठा पक्ष असूनही सरकार स्थापन करण्यात अपयश येत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. आपल्याला कर्नाटकच्या जनतेसाठी काय-काय करायचं होतं, याचा पाठाच त्यांनी वाचला. आगामी काळात राज्यभर फिरू आणि येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला सर्व २८ जागी निवडून आणू अशी गर्जनाही त्यांनी केली. त्यानंतर आपण राजीनामा देण्यासाठी राजभवनावर जात असल्याचं येडियुरप्पांनी जाहीर केलं आणि ते विधानसभेतून निघून गेले..