कर्नाटक निवडणूक २०१८ : मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची प्रतिष्ठा पणाला

कुरुबु अर्थात धनगर समाजाचं नेतृत्व करणाऱ्या सिद्धरामय्या यांनी गेल्या पाच वर्षात कर्नाटक राज्यात अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या.

Updated: May 4, 2018, 04:09 PM IST
कर्नाटक निवडणूक २०१८ : मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची प्रतिष्ठा पणाला title=

प्रताप नाईक, झी मीडिया, म्हैसूर : देशात झालेल्या विविध राज्यांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली. त्यामुळं काँग्रेसच्या ताब्यात असणारं एकमेव  कर्नाटक राज्य टिकावं यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पाच वर्षांत अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या... पण हे करत असताना त्यांनी हिंदू धर्मात फूट पडून मत काँग्रेसच्या बाजुने यावीत यासाठी अहिंदा चळवळ राज्यभर राबवली.

कर्नाटक राज्यातील म्हैसर शहर... सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहर म्हणून म्हैसूरची ओळख... याच म्हैसूर जिल्हयाचं प्रतिनिधीत्व कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या करतात... म्हैसूर जिल्हा हा जनता दल सेक्युलरचा गड मानला जात होता. पण २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत या जिल्ह्यात ११ पैंकी तब्बल ८ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला. त्यामुळं सिद्धरामय्या यांना आपल्या म्हैसूर जिल्ह्यातूनच चांगलं बळ मिळालं. 

कुरुबु अर्थात धनगर समाजाचं नेतृत्व करणाऱ्या सिद्धरामय्या यांनी गेल्या पाच वर्षात कर्नाटक राज्यात अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या. त्यांनी कर्नाटक राज्यात आपला दबदबा निर्माण केलाय. इतकच नव्हे, तर याला समातंर अहिंदा चळवळ राबवून अल्पसंख्याक, हिंदू धर्मातील इतर मागासवर्गीय, आणि दलीत यांना एकत्र आणून व्होटबँक पक्की करण्याचा प्रयत्न केलाय. याचाच एक भाग म्हणून त्यांनी शेवटच्या टप्यात लिंगायितांना स्वतंत्र धर्माची मान्यता देवून लिंगायितांमध्ये फूट पाडली. या सर्वांचा फायदा सिद्धरामय्या यांना येत्या निवडणुकीत होणार... पण, तोटाही तितकाच सहन करावा लागणार, असं दिसतंय.

सिद्धरामय्या यांनी दिलेलं स्थिर सरकार आणि या सरकारच्या काळात त्यांच्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, हे सिद्धरामय्या सरकारची जमेची बाजु... पण सिद्धरामय्या यांच्या होमपिच असणाऱ्या म्हैसूर जिल्ह्यात सर्व काँग्रेस उमेदवार  विजयी होणार का? याची खात्री कुणालाच देता येत नाही.

सिद्धरामय्या यांनी राज्यामध्ये लोकउपयोगी योजना राबविल्या.. पण युवकांच्यामध्ये मोदीची क्रेज असल्याचं अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. आणि हेच मोठं आव्हान सिद्धरामय्या यांच्यासमोर असणार आहे