बेळगाव : एकाच कुटुंबातील वडिल-मुलगा, वडिल-मुलगी, आई-सुन राजकारणात आल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या आहेत, पाहिल्या आहेत. पण एकाच कुटुंबातील चार सख्खे भाऊ राजकारण आल्याचं आणि थेट विधानसभेचे आमदार झाल्याची घटना कधी ऐकली आहे का? पण कर्नाटक विधानसभेत हे शक्य झालं आहे. चार सख्खे भाऊ आमदार होण्याची देशातली ही पहिलीच घटना आहे.
बेळगावमधील जारकीहोळी कुटुंबातील तिघे भाऊ विधानसभेचे आमदार आहेत, तर आता एक भाऊ विधानपरिषदेचा सदस्य झाला आहे.
जारकीहोळी कुटुंबातील सर्वात मोठा भाऊ रमेश हे गोकाक विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, तर भालचंद्र हे आरभावी मतदारसंघाचे आमदार आहेत. हे दोघंही भाजपचे आमदार आहेत. तर काँग्रेसच्या तिकिटावर सतीश हे यमकनमर्डी मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले. आता अपक्ष म्हणून लखन जारकीहोळी हे विधानपरिषदेवर निवडून गेले आहेत.
रमेश जारकीहोळी 1999 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. त्यानंतर सलग पाचवेळा त्यांनी विधानसभेवर निवडून येण्याचा पराक्रम केला. पण 2019मध्ये त्यांनी काँग्रेसचा हात सोडला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे भाजपकडूनही ते विजयी झाले.
भाजपकडून निवडणूक लढवलेले भालचंद्र जारकीहोळी हेही भाजप सत्तेत असताना मंत्रिपदावर होते. 2008 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
तर धर्मनिरपेक्ष जनता दलात असणाऱ्या सतीश जारकीहोळी यांनी 2006 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला, आणि 2008 मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले. राज्यात काँग्रेस पक्षाचं सरकार असताना सतीश जारकीहोळी यांनी मंत्रीपदही भूषवलं.