मुंबई : अनेकदा गायी पाळणारे लोक त्यांच्या जनावरावर खूप प्रेम करतात आणि त्यांना घरातील सदस्यासारखे समजले जाते. कर्नाटकातील एका व्यक्तीने असेच केले आणि दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या पाळीव गाय आणि वासराची पूजा केली. मात्र याच दरम्यान असे काही घडले ज्यामुळे या कुटुंबाचा त्रास खूप वाढला.
कर्नाटकातील हिपनहल्ली येथील एका कुटुंबाने दिवाळीनिमित्त घरी गाय आणि वासराची पूजा केली होती. यावेळी वासराला सोनसाखळी घालून सन्मानित करण्यात आले. मग काही वेळाने साखळी काढून समोर ठेवली आणि सोबत काही फुलांच्या माळा होत्या. मात्र कुटुंबीयांनी पूजेनंतर पाहिले तर ती सोनसाखळी गायब होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, साखळी हरवल्यामुळे कुटुंबीय खूपच अस्वस्थ झाले होते आणि त्यांनी गायीने साखळी गिळली असल्याचा संशय व्यक्त केला. यानंतर डॉक्टरांना बोलावून गाईची तपासणी करण्यात आली, त्यात गायीने साखळी गिळली असून ती तिच्या पोटात असल्याचे आढळून आले. मग काय, कुटुंबाने महिनाभर शेणखताचे बारकाईने निरीक्षण सुरू केले.
शेणाचे रात्रंदिवस निरीक्षण
जेव्हा जेव्हा गाय आणि तिचे वासरू शेण देतात तेव्हा त्यात साखळीचा शोध घेतला जातो. पण तरीही ती सोनसाखळी गायीच्या पोटातून बाहेर पडू शकलेली नाही. नंतर त्या 20 ग्रॅमच्या साखळीसाठी गायीवर शस्त्रक्रिया करावी लागली आणि त्यानंतरच कुटुंबाला सोन्याची साखळी परत मिळवता आली.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पोटात असताना साखळीचे वजन 2 ग्रॅमने कमी होऊन 18 ग्रॅम झाले. डॉक्टरांनी गायीवर शस्त्रक्रिया केली आणि धातूचा शोध घेतल्यानंतर ती साखळी पोटातून बाहेर काढण्यात आली. आता साखळी मिळाल्याने त्यांना आनंद होत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे, मात्र यामुळे त्यांच्या गायीवर शस्त्रक्रिया करावी लागली, ही दुःखाची बाब आहे.