'तीन तलाक'वरच्या बंदीचं राहुल गांधींकडून स्वागत पण सिब्बल म्हणतात...

'तीन तलाक'ला सर्वोच्च न्यायालयाकडून सहा महिन्यांची स्थगिती देण्यात आलीय.

Updated: Aug 22, 2017, 09:32 PM IST
'तीन तलाक'वरच्या बंदीचं राहुल गांधींकडून स्वागत पण सिब्बल म्हणतात... title=

नवी दिल्ली : 'तीन तलाक'ला सर्वोच्च न्यायालयाकडून सहा महिन्यांची स्थगिती देण्यात आलीय. या सहा महिन्यांच्या काळामध्ये सरकारनं कायदा बनवावा अन्यथा कायदा बनेपर्यंत तीन तलाकवर बंदी कायम राहिल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

तीन तलाकवरच्या बंदीवर केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी यूटर्न घेतला आहे. तीन तलाकवरच्या बंदीचं मी स्वागत करतो. हा निर्णय पर्सनल लॉची सुरक्षा करत असल्याचं सिब्बल म्हणाले. तसंच तीन तलाक पद्धतीवरही त्यांनी टीका केली.

मुख्य म्हणजे कपील सिब्बल हे सर्वोच्च न्यायालयात तीन तलाकला पाठिंबा देणाऱ्या याचिकाकर्त्यांचे वकिल होते. सर्वोच्च न्यायालयात तीन तलाकच्या बाजूनं मत मांडताना कपिल सिब्बल यांनी तलाकची तुलना राम मंदिराशी केली होती. अयोध्येमध्ये रामाचा जन्म झाला ही जशी हिंदूंची श्रद्धा आहे तसाच तीन तलाक हा मुस्लिमांच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे संविधानिक किंवा असंविधानिक नैतिकतेच्या आधारावर याचा निर्णय होऊ शकत नाही. कायदा आणि न्यायालय यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला.