शरद बोबडे बनले देशाचे ४७ वे सरन्यायाधीश

देशाच्या ४७ व्या सरन्यायाधीशपदी शरद बोबडे

Updated: Nov 18, 2019, 10:19 AM IST
शरद बोबडे बनले देशाचे ४७ वे सरन्यायाधीश title=

नवी दिल्ली : न्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांनी आज देशाच्या ४७ व्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली आहे. २३ एप्रिल २०२१ पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना शपथ दिली. अयोध्या प्रकरणाच्या ऐतिहासिक निर्णयामध्ये ५ न्यायाधीशांच्या खंडपीठामध्ये त्यांचा देखील समावेश होता. ६३ वर्षांचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी रंजन गोगोई यांची जागा घेतली आहे. त्यांचा सरन्यायाधीश म्हणून १७ महिन्यांचा कार्यकाळ असले. २३ एप्रिल २०२१ ला ते निवृत्त होणार आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकरणात निर्णय़ दिले आहेत.

महाराष्ट्राचे आणि नागपूरचे सुपूत्र शरद बोबडे हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाल्यामुळे नागपूर उच्च न्यायालयात सर्व न्यायाधीश आणि वकिलांनी राष्ट्रपती भवनातील शरद बोबडे यांचा शपथ ग्रहण सोहळा मोठ्या स्क्रीवर पहिला. नागपूर हायकोर्टाच्या ऑडिटोरिममध्ये याकरता खास व्यवस्था करण्यात आली होती. शरद बोबडे हे न्यायालयीन क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांसाठी तसेच नागपूर हायकोर्ट बार एसोसिएशनच्या सर्व वकिलांसाठी एक आदर्श आहेत. ते आमचे प्रेरणास्थान व गौरव स्थान आहेत अशी प्रतिक्रिया उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी यावेळी दिली.

शरद बोबडे यांचा जन्म नागपूरमध्ये २४ एप्रिल १९५६ ला झाला. नागपूर यूनिवर्सिटीमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. १९७८ मध्ये ते बार काउंसिल ऑफ महाराष्ट्राचे सदस्य होते. त्यानंतर १९९८ मध्ये ते वरिष्ठ वकील म्हणून काम करत होते.

२९ मार्च २००० साली ते मुंबई हायकोर्टाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले. १६ ऑक्टोबर २०१२ ला ते मध्य प्रदेश हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश बनले. त्यानंतर सुप्रीम कोर्टात ते १२ एप्रिल २०१३ ला न्यायाधीश बनले.