जोधपूर: न्यायाने कधीही सूडभावनेचे रुप घेता कामा नये, असे प्रतिपादन सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केले. ते शुक्रवारी जोधपूर येथील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी हैदराबाद एन्काउंटरच्या पार्श्वभूमीवर सूचक वक्तव्य केले. सरन्यायाधीश बोबडे यांनी म्हटले की, न्याय हा तात्काळ व्हायला पाहिजे किंवा झालाच पाहिजे, असे मला वाटत नाही. तसेच न्यायाने कधीही सूडाचे रुप घेता कामा नये. न्यायाचा सूड झाला तर त्याचे चारित्र्य संपते, असे मत सरन्यायाधीश बोबडे यांनी व्यक्त केले.
काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये पशुवैद्यक असलेल्या तरुणीवर चार तरूणांनी बलात्कार केला होता. यानंतर आरोपींनी या तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह जाळला होता. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. यानंतर पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले होते.
'हिंसेवर विश्वास असणाऱ्या व्यक्तीकडे देशाचा कारभार असल्याने अत्याचार वाढलेत'
मात्र, गुरुवारी पहाटे हे चारही आरोपी चकमकीत ठार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. पोलिसांनी या आरोपींना पुराव्यांची खातरजमा करण्यासाठी घटनास्थळी नेले होते. त्यावेळी या आरोपींना पोलिसांकडील शस्त्रे हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बंदुकीतून पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चारही आरोपी ठार झाले होते.
#WATCH: Chief Justice of India (CJI) Sharad Arvind Bobde: I don't think justice can ever be or ought to be instant. And justice must never ever take the form of revenge. I believe justice loses its character of justice if it becomes a revenge. pic.twitter.com/oKIHKecHqt
— ANI (@ANI) December 7, 2019
या आरोपींनी पीडितेवर अमानुषपणे अत्याचार केल्यामुळे देशभरात त्यांच्याविषयी संतापाची भावना होती. त्यामुळे अनेकांनी सायबराबाद पोलिसांच्या या कृतीचे स्वागत आहे. तर अनेकांनी हा प्रकार म्हणजे कायद्याची पायमल्ली असल्याचे सांगत पोलीस एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मानवधिकार आयोगाकडून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.