भारताला मोठे यश; एअर स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मदचा मोठा शस्त्रसाठा उद्ध्वस्त

या हल्ल्यामुळे भारताने पुन्हा एकदा जगाला आपले लष्करी सामर्थ्य दाखवून दिले आहे. 

Updated: Feb 26, 2019, 02:45 PM IST
भारताला मोठे यश; एअर स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मदचा मोठा शस्त्रसाठा उद्ध्वस्त title=

नवी दिल्ली: भारतीय वायूदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकमुळे झालेल्या नुकसानाची नेमकी व्याप्ती आता समोर येताना दिसत आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास भारतीय वायूदलाच्या मिराज-२००० या विमानांच्या ताफ्याने बालाकोट परिसरातील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर तुफान बॉम्बफेक केली होती. यावेळी साधारण १००० किलो स्फोटकांचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदची मोठी हानी झाली आहे. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, बालाकोट परिसरातील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर शस्त्रास्त्रांचा अगणित साठा होता. मात्र, भारतीय वायूदलाच्या हल्ल्यात हा शस्त्रांचा साठा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे समजते. यामध्ये २०० एके रायफल, अगणित काडतुसे, ग्रेनेड, स्फोटके आणि डिटोनेटर अशा साधनांचा समावेश होता. या हल्ल्यात मसूद अजहरचा मेव्हणा आणि जैश ए मोहम्मदचा प्रमुख नेता मौलाना युसूफ अजहर याच्यासह १५० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे जैश-ए-मोहम्मदला मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे. 

या हल्ल्यामुळे भारताने पुन्हा एकदा जगाला आपले लष्करी सामर्थ्य दाखवून दिले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारत काहीतरी मोठी कारवाई करणार, याची कुणकुण सर्वांनाच होती. भारताकडूनही तसा स्पष्ट इशारा देण्यात आला होता. त्यामुळे पाकिस्तान कमालीचा सावध झाला होता. मात्र, त्यानंतरही भारताने हवाई हल्ला करून पाकिस्तानला धक्का देत आपली मोहीम यशस्वी करुन दाखविली. 

दरम्यान, या हल्ल्यानंतर पाकिस्ताननेही स्वसंरक्षणार्थ आम्हालाही प्रत्युत्तर देण्याचा हक्क असल्याची दर्पोक्ती केली आहे. तत्पूर्वी कच्छ येथील वाळवंटात पाकिस्तानचे टेहळणी विमान भारताने पाडले. त्यामुळे पाकिस्तानही लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे भारतीय लष्कराकडून सीमारेषेवरील सुरक्षा अधिक कडेकोट करण्यात आली आहे. भारतीय वायूदलाकडून सीमारेषेवर विमानविरोधी शस्त्रास्त्रे तैनात करण्यात आली आहेत.