अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी 'अविवाहीत' असल्याचं नुकतंच मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी एका जाहीर कार्यक्रमात म्हटलं होतं. यानंतर नरेंद्र मोदी यांच्यापासून दूर राहणाऱ्या त्यांच्या पत्नी जसोदाबेन यांनी आनंदीबेन यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतलाय. 'एका शिक्षित महिलेचं (आनंदीबेन) एका शिक्षेकेबद्दल असं म्हणणं अयोग्य आहे. त्यांच्या या वक्तव्याचा भारताच्या पंतप्रधानांच्या प्रतिमेवरही वाईट परिणाम होऊ शकतो. मोदी माझ्यासाठी आदरणीय आहेत, ते माझ्यासाठी राम आहेत' असं जसोदाबेन यांनी म्हटलंय.
'तुमच्या मुलांसाठी, तुमच्यासाठी 'त्यांनी' लग्न केलं नाही, हे संपूर्ण जगाला माहीत आहे... पंतप्रधान मोदींनी विवाह केलेला नाही, हे तर तुम्हाला माहीत आहे ना... नरेंद्र भाईंनी विवाह केलेला नाही. परंतु, महिला आणि मुलांना काय अडचणी येतात, हे मोदींना अविवाहीत असतानाही समजतं' असं आनंदीबेन यांनी हरदा जिल्ह्यातील तिमारी गावच्या आंगनवाडी केंद्रावरच्या कार्यक्रमात म्हटलं होतं. त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच वायरल झाला होता. परंतु, आपण विवाहीत असल्याचं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान मान्य केलं होतं.
यावर प्रतिक्रिया विचारल्यावर जशोदाबेन यांनी 'मोदी अविवाहीत असल्याच्या वक्तव्यावर मी हैराण' असल्याचं म्हटलंय. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आपला अर्ज दाखल करताना खुद्द मोदींनीच आपण विवाहीत असल्याचं सांगितलं होतं. त्या कागदपत्रांवर त्यांनी माझ्या नावाचाही उल्लेख केलाय, असंही त्यांनी म्हटलंय.
जसोदाबेन यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतोय... त्यांच्या भावानंच हा व्हिडिओ शूट केलाय. 'आनंदीबेन यांच्या वक्तव्यावर पहिल्यांदा आमचा विश्वासच बसला नव्हता. पण, नंतर मात्र आम्ही याचं उत्तर देण्याचा निर्णय घेतला. आम्ही आमच्या घरीच मोबाईल फोनवर जसोदाबेन यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, असं जसोदाबेन यांचे भाऊ अशोक मोदी यांनी म्हटलंय.